लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रेल्वेमध्ये प्रवेश करताना आणि उतरताना होणारी गर्दी पाहता अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीकोणातून परभणीरेल्वेस्थानकावर गेल्या तीन दिवसांपासून रांगा लावून महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे पोलिसांच्या निगराणीत प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे़परभणी रेल्वेस्थानकावरून दररोज जवळपास ८० रेल्वे गाड्यांची ये- जा सुरू असते़ त्यातील देवगिरी एक्सप्रेस, नंदीग्राम एक्सप्रेस, पनवेल एक्सप्रेस या तीन रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ त्यामुळेच चोरी किंवा गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना या तीन रेल्वे गाड्यांमध्येच होत आल्याचा प्रकार सातत्याने समोर आला आहे़ त्यामुळे अशा अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी परभणी रेल्वेस्थानकावर जीआरपीएफ आणि आरपीएफ या पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने या तिन्ही रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना रांगेमधून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून या रेल्वे गाड्या परभणी स्थानकावर आल्यानंतर जीआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक महादेव वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची पथके प्रवाशांना रेल्वे प्रवेश करताना रांगा लावण्याचे आदेश देतात़ त्यानुसार प्रवासीही रांगा लावून आतील प्रवासी उतरण्याची वाट पाहतात आणि सर्व प्रवासी उतरल्यानंतर बाहेरील प्रवासी रांगेनेच आत प्रवेश करतात़ विशेष म्हणजे बहुतांश वेळा विरुद्ध बाजुने प्रवासी रेल्वेत प्रवेश करतात़ या प्रकाराला पूर्णत: आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी काही प्रवाशांना पोलिसी खाक्याही दाखविला आहे़ परिणामी तूर्ततरी या तिन्ही रेल्वेत शिस्तीतच प्रवासी प्रवेश करीत आहेत़ यामुळे पॉकेटमारी, मोबाईल चोरी आदी गोष्टींना पायबंद बसला आहे़ शिवाय रेल्वेस्थानकावर पहिल्यांदाच गोंगाट व घाई न करता प्रवासी रेल्वे प्रवेश करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़
परभणी रेल्वेस्थानक : प्रवाशांचा आता रांगेतून रेल्वे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:53 AM