लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : वारसदारांच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवजाच्या आधारे तालुक्यातील खादगाव येथील रेशन दुकान आपल्या नावाने करणाऱ्या दोघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने ८ मार्च रोजी मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात अरबूजवाडी येथील पुष्पादेवी राम मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खादगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार सोपानराव मानाजी फड यांचे २१ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले. त्यांच्या नावे असलेले स्वस्त धान्य दुकान आपल्या नावाने करण्यासाठी मयत सोपानराव फड यांचे नातू दिलीप बालासाहेब फड (रा. यज्ञभूमी परिसर, गंगाखेड) व श्रीनिवास बालासाहेब फड (रा.खादगाव, ता. गंगाखेड) यांनी संगनमत करून सोपानराव फड यांच्या पश्चात असलेल्या इतर वारसांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून १०० रुपयांच्या बॉण्डपेपरवर संमतीपत्र तयार केले.या संमतीपत्रावर फिर्यादी व इतर वारसांच्या खोट्या स्वाक्षºया करून बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर स्वस्त धान्य दुकान मिळण्याबाबतचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर केला. एका आठवड्याच्या आत कार्यालयीन कार्यवाही पूर्ण करून जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडून स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळविला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार दिलीप फड यांनी अनामत रक्कम व प्राधिकारपत्र फीस जमा केली.मयत सोपानराव फड यांच्या इतर वारसांना डावलून त्यांच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना दिलीप फड यांनी जाणीवपूर्वक आपल्या हक्कात हस्तांतरित करून घेतला. त्यामुळे फिर्यादी पुष्पादेवी राम मुंडे (रा. अरबूजवाडी, ता. गंगाखेड), अशोक सोपानराव फड (रा.खादगाव ता. गंगाखेड) यांची व शासनाची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. पुष्पादेवी मुंडे व अशोक फड यांनी या प्रकरणी प्रथम पोलीस ठाण्यात व त्यानंतर न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून ८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी दिलीप बालासाहेब फड व श्रीनिवास बालासाहेब फड यांच्याविरुद्ध खोट्या स्वाक्षरी करीत खोटे व बनावट दस्ताऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवून फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्यावरून विविध कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.प्रकरण दाबण्याचाही झाला होता प्रयत्नपुष्पादेवी मुंडे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला. त्यातूनच दिलीप फड यांनी पुष्पा मुंडे यांना जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात याप्रकरणी वेळेत गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे मुंडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरुन ८ मार्च रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी: बनावट दस्तऐवज तयार करून रेशन दुकान हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:27 AM