विजय चोरडिया ।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (जि. परभणी): तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीतून जवळपास १ कोटी रुपयांचा महसूल जिंतूर येथील प्रशासनाने जमा केला असला तरी आजही लाखो रुपयांच्या वाळुची चोरी सुरू असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळते.जिंतूर तालुक्यामधील पूर्णा नदीवर वझर, निलज या दोन मुख्य वाळू धक्क्याबरोबरच करपरा, दुधना या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होतो. दररोज शेकडो वाहनाद्वारे वाळू उपसा केला जात असतानाही शासनाला मात्र पुरेसा महसूल मिळत नव्हता.जिंतूर तालुक्यात आठ वाळू धक्के असून, या वाळू धक्क्यांचा अद्याप लिलाव झाला नाही. या आठ धक्यातूून प्रशासनाला हवा असणारा महसूल मिळत नसल्याने मागील वर्षी महसूल प्रशासनाने तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या १०८ वाहनांवर कारवाई केली. त्यातून प्रशासनाला ३४ लाख ५१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून आठ वाहनांवर कार्यवाही प्रलंबित आहे. त्यांच्याकडून १६ लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. ही कारवाई १ जानेवारी २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत करण्यात आली.२०१७-१८ मध्ये अनाधिकृतरित्या जमा करण्यात आलेल्या वाळू साठ्यावर महसूल प्रशासनाने छापे टाकून ते जप्त केले होते. तालुक्यातील ५४ साठ्यात २ हजार ७५५ ब्रॉस वाळू जप्त करण्यात आली होती. या साठ्यांचा लिलाव करून प्रशासनाने २९ लाख ७९ हजार रुपये महसूल जमा केला. २०१८-१९ मध्ये अनाधिकृतरित्या साठवून ठेवलेल्या २० वाळू साठ्यावर छापे टाकून प्रशासनाने ५८४ ब्रॉस रेती जप्त केली. यातून १ लाख ८० हजार रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला.दरम्यान या वर्षभरामध्येच जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, उपविभागीय महसूल अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी धाडी टाकून डिग्रस येथील बोट, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर्स व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईनंतरही वाळू चोरीला लगाम बसला नाही. वझर व डिग्रस धक्क्यातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होत आहे. प्रशासनाने मागच्या वर्षभरात १ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई केली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर तालुक्यातून वाळू चोरी सुरू आहे.तालुक्यातून वाळू चोरीचा महसूल ज्याप्रमाणे मिळाला, त्या प्रमाणे मुरूम व गौण खनिज धारकांवर कारवाई केल्याचे दिसत नाही. जिंतूर शहराजवळील मैनापुरी माळ, पुंगळा माळ, नेमगिरी परिसरातील माळ व ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या बाजूचा माळ या ठिकाणाहून कोट्यावधी रुपयांचे गौण खनिज चोरीस जात आहे. महसूल प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.साखळी पद्धतीनेवाळू चोरांची मैत्रीतालुक्यातील वाळू धक्के लिलावात घेण्याऐवजी सर्वजण मिळून एकत्रितरित्या वाळू घाटाची बोली बोलतात. विशिष्ट रकमेच्या वर बोली बोलायची नाही. या सबबीवर घाट घेतला जातो. जर प्रशासनाने घाट लिलावात सोडला नाही तर अवैध मार्गाने सर्रास चोरी केली जाते. साखळी करीत असताना पक्षभेद बाजूला ठेऊन सर्वजण एकत्र येतात, हे विशेष.
परभणी : गौण खनिज उत्खननात ५० लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:30 AM