प्रसाद आर्वीकर।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील महसूलचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महसूल मंडळांसह ७६ तलाठी सज्जांची नव्याने निर्मिती केली जात आहे. या नवीन महसूल विभागांची पुनर्रचनाही झाली असून, प्रशासनाने प्रारुप आराखडा तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यात या नव्या पूनर्रचनेला अंतिम मान्यता दिली जाणार आहे.परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कारभार यापूर्वी ४० मंडळ कार्यालये आणि २४६ तलाठी सज्जांमार्फत चालाविला जात होता. त्यामुळे एका सज्जांतर्गत १० ते १५ गावांचा समावेश असल्याने अनेक वेळा शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत असे. यावर मात करण्यासाठी मंडळ कार्यालये आणि तलाठी सज्जांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.राज्यात नवीन तलाठी सज्जे आणि महसूली मंडळांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार परभणी जिल्ह्यात तलाठी सज्जे आणि महसुली मंडळांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात ४० महसूल मंडळ कार्यालय आणि २४६ तलाठी सज्जांवरुन महसूलचा कारभार चालविला जात असे. नव्याने केलेल्या पुनर्रचनेत १३ महसूल मंडळ आणि ७६ तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ५३ मंडळ कार्यालय आणि ५२२ तलाठी सज्जांची निर्मिती होणार आहे.या पुनर्रचनेमुळे मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जांच्या अंतर्गत गावांची संख्या कमी होणार असल्याने ग्रामस्थांना महसूल प्रशासनाचे लाभ वेळेत देणे सोयीचे होणार आहे.जिल्ह्यात महसूल मंडळ आणि तलाठी सज्जाचे पूनर्रचनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मंडळांची पूनर्रचना करण्यात आली असून १५ फेब्रुवारी रोजी या नवीन महसूल मंडळ व तलाठी सज्जांना अंतिम मंजुरी दिली जणार आहे. तलाठी सज्जांच्या स्थापनेचा कार्यक्रम यापूर्वीच पूर्ण झाला आहे.३१ आॅक्टोबर रोजी तलाठी सज्जांची अंतिम अधिसूचनाही प्रसिद्ध झाली आहे. तर नवीन महसूल मंडळाच्या संदर्भात अंतिम अधिसूचना १५ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. जिल्ह्यात महसूल मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जांची संख्या वाढल्याने प्रशासन जास्तीत जास्त ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.
परभणी ; प्रशासकीय सोयीसाठी पुनर्रचना, १३ मंडळे, ७३ सज्जांची नव्याने निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:29 AM