लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील खाजगी संवर्गात नोंदणी असलेल्या आॅटोरिक्षांना नवीन परवाने देण्यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाने ३१ डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली आहे़ या संदर्भात आ़डॉ़ राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र दिल्यानंतर गृह विभागाने १९ आॅगस्ट रोजी याबाबतचे आदेश काढले आहेत़परवाने नसल्याच्या कारणावरून तसेच अन्य विविध कारणांवरून परभणीतील खाजगी आॅटो चालकांवर आरटीओ कार्यालयाच्या वतीने शुक्रवारपासून कारवाई करण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना १९ आॅगस्ट रोजी सकाळी पत्र दिले़ त्यामध्ये परभणी येथील आॅटोरिक्षा चालकांवर करण्यात आलेली कारवाई स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली़ कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली आॅटो चालकांचा परभणीत छळ सुरू असून, दुष्काळाने होरपळून गेलेल्या जनतेला रोजगाराची संधी मिळणे कठीण आहे़त्यामुळे सदरील वाहन चालक आॅटोवर आपला उदरनिर्वाह करतात़ त्यामुळे या आॅटोचालकांना नियमानुसार परवाना प्राप्त करून घेण्यासाठी संधी द्यावी, अशी मागणी केली होती़ त्यानंतर दुपारी गृह विभागाच्या वतीने या संदर्भात तातडीने आदेश काढण्यात आले़ त्यामध्ये खाजगी संवर्गात नोंदणी असणारी सर्व आॅटोरिक्षा नवीन परवान्यास परिवहन संवर्गात नोंदणी करताना अथवा सध्याच्या परवान्यावर बदली वाहन म्हणून परिवहन संवर्गात नोंदणी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात येत आहे़, असे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़ त्यामुळे आता ज्या आॅटो चालकांकडे शासनाचा परवाना नाही त्यांना या संदर्भात नोंदणी करून परवाना काढता येणार आहे़ यासाठी आरटीओ कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे़
परभणी : खाजगी आॅटो परवाना नोंदणीस शासनाची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:20 AM