लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळू घाटांच्या लिलावास दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्याने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील वाळू टंचाईचे संकट गडद झाले आहे़जिल्ह्यामधील वाळू घाटांची आॅगस्ट महिन्यात नियमित लिलाव प्रक्रिया होत असते; परंतु, विविध कारणांमुळे ही प्रक्रिया गेल्या चार महिन्यांपासून झालेली नाही़ त्यामुळे अवैध मार्गाने जिल्ह्यात वाळू उपसा सुरू आहे़ परिणामी वाळू टंचाई निर्माण झाली असून, तीन ब्रास वाळुला नागरिकांना जवळपास २२ ते २५ हजार रुपये काळ्या बाजारात मोजावे लागत आहेत़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती़ त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या अनुषंगाने ११ ते २६ डिसेंबर दरम्यान, ३२ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती़ त्यानुसार यासाठी आॅनलाईन निविदा दाखल करण्यास सुरुवातही झाली होती़ परंतु, दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने या संदर्भात ११ डिसेंबर रोजी महसूल विभागाला आदेश दिला़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी ही ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ आता पुढील निर्णय कधी होईल, हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही़ त्यामुळे वाळू टंचाईत भर पडण्याची शक्यता आहे़ शिवाय खाजगी आणि शासकीय बांधकामांवर याचा परिणाम होणार आहे़लिलाव प्रक्रियेंतर्गत गोदावरी नदीतील २५, दूधना नदीतील ५ आणि पूर्णा नदीतील २ अशा एकूण ३२ वाळू घाटांचा लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता़ त्यामध्ये सर्वाधिक किंमत गोदावरी नदीपात्रातील वाळू घाटाच्या लिलावाला ठेवण्यात आली होती़
परभणी : वाळुची लिलाव प्रक्रिया बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:02 AM