लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी जागा आरक्षित ठेवली असतानाही या आरक्षित आसनांचा इतर प्रवाशी वापर करीत असल्याने बस गाड्यांमधील आरक्षण नावालाच शिल्लक असल्याचे दिसत आहे़एसटी महामंडळाच्या वतीने राज्यभरात बससेवा चालविली जाते़ महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना महिला, ज्येष्ठ नागरिकांना जागेची समस्या उद्भवू नये, या उद्देशाने प्रत्येक बस गाड्यांमध्ये काही जागा आरक्षित केलेल्या आहेत़ या जागांवर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीच प्रवास करणे अपेक्षित असताना इतर प्रवासी या आसनांवर बसून प्रवास करतात आणि खरे लाभार्थी असलेले प्रवासी मात्र अनेक वेळा उभे राहून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते़ बस गाड्यांमध्ये आरक्षित जागांवर संबंधित व्यक्तीने प्रवास केल्याचे अभावानेच दिसून येत आहे़उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळी सुट्या आणि इतर सणासुदीच्या काळात बस गाड्यांना प्रवांशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते़ या काळात बसमध्ये जागा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जातात़ स्थानकात बस दाखल झाल्यानंतर बस भोवती प्रवाशांचा गराडा पडतो़ कोणी खिडकीतून तर कोणी चालकाच्या केबीनमधून आत शिरून जागा मिळवितो़ ही जागा मिळविण्याच्या चढाओढीत सर्रास आरक्षित जागेवरही हक्क सांगितला जातो आणि त्या जागेवर बसून लाभार्थी नसलेला प्रवासी प्रवास करतो़; परंतु, आरक्षित जागेवरून प्रवाशांना उठविण्याची तसदी कोणीही घेत नाही़ नियम असतानाही तो सर्रास डावलून प्रवास केला जात आहे़ परिणामी खरे लाभार्थी मात्र उभे राहून एसटी बसमधून प्रवास करतात़ याविरूद्ध महामंडळ प्रशासनही फारसी कारवाई करीत नसल्याने आरक्षित जागेवर बसून प्रवास करण्याचे प्रकार सर्रास घडत असून, ते आता सर्वसामान्यही झाले आहे़महामंडळाने याविरूद्ध कडक भूमिका घेऊन ज्यांच्यासाठी आसन आरक्षित केले आहे, त्यांना ते आसन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़नागरिकही वापरत नाहीत अधिकारएसटी महामंडळाच्या बस गाड्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, पत्रकारांसाठी आसन आरक्षित असताना ते आसन मिळविण्यासाठी संबंधित प्रवासीही आग्रही भूमिका घेत नाहीत़ त्यामुळे नियम डावलून आरक्षित आसनावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ महिलांना बसमध्ये जागा उपलब्ध नसेल तर महिलांसाठी आरक्षित असलेल्या आसनाची मागणी त्यांनी वाहकांकडे करणे अपेक्षित आहे़ परंतु, अशी मागणीच केली जात नाही. महामंडळाच्या वाहकांनीही आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसला असेल तर त्यास संबंधित नियमाची अंमलबजावणी करून महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आरक्षित आसन मिळवून देणे हे वाहकाचे कर्तव्य आहे़ परंतु, वाहकही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे़ महामंडळ प्रशासनाने या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे़
परभणी : बसमधील आसनांचे आरक्षण नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:27 AM