परभणी : शहरातील विविध भागांतून चोरीला गेलेल्या सहा दुचाकी २२ जानेवारी रोजी पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. त्यामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
चालू वर्षात नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वीही शहरातील इतर भागात आणि जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. हे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्या संदर्भात माहिती घेत असताना चोरीची दुचाकी घेऊन दोघेजण सेलूहून सातोना रस्त्याने जात असल्याची माहिती २१ जानेवारी रोजी पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सातोना रस्त्यावर सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. या आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे. तर दुसर्या आरोपीने त्याचे नाव हरिष मखमले (२५) असे सांगितले. दोघेही जालना जिल्ह्यातील सातोना येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशीनंतर ही दुचाकी विष्णू आकात (रा.सातोना) याच्या मदतीने परभणी येथून चोरुन आणल्याचे सांगितले. तसेच परभणीत इतर चार दुचाकी चोरल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली. यापैकी एक दुचाकी सेलू-सातोना रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ आणि उर्वरित तीन दुचाकी सेलू येथील अजय गोरखनाथ भिसे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत आल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दुचाकी ताब्यात घेतल्या. या दुचाकी नानलपेठ भागातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, पोलीस कर्मचारी मधुकर पवार, शिवाजी धुळगुंडे, शरद मुलगीर, शाम काळे, संजय शेळके, किशोर चव्हाण, कांबळे, गणेश कौटकर, राजेश आगाशे आदींनी केली.
परभणी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीला गेल्या होत्या. विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच विद्यानगर भागातून एक बुलेट चोरट्यांनी पळविली होती. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत बुलेटसह पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पकडले असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.