लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सरत्या आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात १८ हजार ३८२ नवीन वाहनांची भर पडली आहे. यातून एका वर्षात वाहनाच्या खरेदी-विक्रीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ३४ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.स्पर्धेच्या युगात वाहनांनाही मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, ग्रामीण भागात पुर्वी एखाद्या गावात दोन ते तीन वाहने असायची; परंतु, गेल्या काही वर्षामध्ये प्रत्येक घरात दोन दुचाकी दिसून येत आहेत. मागील काही वर्षाच्या तुलनेत गतवर्षी मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी झाली. त्यामुळे जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वाहन खरेदीनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची रितसर नोंदणी केली जाते.प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस खरेदी-विक्री झालेल्या वाहनांचा लेखाजोखा उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून तयार केला जातो. त्यानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हाभरात १८ हजार ३८२ वाहने नव्याने खरेदी करण्यात आली आहेत. यामध्ये १५ हजार ६७१ दुचाकी वाहनांचा समावेश असून कार, जीप या सारखी ९७२ चार चाकी वाहने जिल्ह्यातील रस्त्यावरून धावत आहेत. त्याच प्रमाणे ट्रॅक्टर ९०२, काळी-पिवळी रिक्षा १५९, स्कूल बस ३६, मालवाहतूक ट्रक ५७४ या वाहनांचा समावेश आहे. या नवीन वाहन खरेदीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाला ३४ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच जिल्ह्यातील एकूण वाहनांची संख्या अडीच लाखांच्या घरात गेली आहे. वाहन कंपन्यांनी वाहनांच्या विक्रीवर देऊ केलेली कर्ज सवलत तसेच आकर्षक मॉडेल्स तयार करून विक्रीसाठी आणल्याने वाहनांची खरेदी वाढली आहे. दरवर्षी दिवाळी, दसरा, अक्षयतृतिया, गुढी पाडवा या मुहूर्तावर वाहनांची खरेदी विक्री वाढते. यावर्षी वाहन खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल असल्याचे दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असली तरी दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांचा विकास मात्र होत नाही. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.जिल्ह्यात : सव्वा दोन लाख दुचाकीजिल्ह्यात अलीकडच्या काळात चार चाकी वाहनांचा वापर वाढला आहे. परंतु, असे असले तरी दुचाकी खरेदीत तसूभरही घट झालेली नाही. चार चाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांची खरेदी अधिक आहे. १३ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अडीच लाखांच्या घरात नोंदणीकृत वाहने असून त्यात २ लाख ३० हजार दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तर १० हजार चारचाकी वाहने आहेत.महसूलात घसघशीत वाढ४शासनाच्या महसूलात घसघशीत भर घालणारा विभाग म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे नाव घेतले जाते. दरवर्षी वाहन खरेदी विक्री बरोबरच नुतनीकरण, वाहन चालविण्याचा परवाना, दंडाच्या स्वरुपातून जिल्हा प्रशासनाला या विभागातून मोठा महसूल प्राप्त होतो.
परभणी: वाहन खरेदीतून ३४ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:39 AM