लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): पालम ते गंगाखेड या रस्त्याने बसने प्रवास करताना गंगाखेड आगाराकडून प्रत्येक प्रवाशाला ५ रुपये जादा तिकीटदर आकारून लूट केली जात आहे़ याबाबत वारंवार तक्रारी करूनही बदल झालेला नाही़ त्यामुळे प्रवाशांत नाराजीचा सूर निर्माण झाला आहे़पालम ते गंगाखेड या मार्गावर बीड जिल्ह्यातील विविध आगारातील गाड्या नांदेडला जातात़ या बसमध्ये प्रवास केल्यास पालम ते गंगाखेड प्रत्येक प्रवासी २५ रुपये बस भाडे आकारले जाते़ याच मार्गावर गंगाखेड आगारातील गाड्यांमधून प्रवास केल्यानंतर प्रवाशांना प्रति प्रवासी ३० रुपये मोजावे लागत आहेत़ एसटी महामंडळाच्या भाड्यासाठी एकच नियम असणे गरजेचे आहे़ मात्र पाच रुपये जास्तीचे बस भाडे आकारून गंगाखेड आगार प्रवाशांची लूट करीत आहे़या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात़ पालम ते गंगाखेड हे अंतर गंगाखेड आगारात जास्तीचे दाखविण्यात आल्याने प्रवासी भाड्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागत आहे़ या रस्त्याने गंगाखेड आगाराकडून कमी प्रमाणात बस गाड्या सोडल्या जातात़ तसेच ५ रुपये जास्तीचे भाडे आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये गंगाखेड आगाराबद्दल कमालीची नाराजी पसरली आहे़
परभणी : गंगाखेड आगाराकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:50 PM