लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील साखलाप्लॉट भागात वीज तारांचे जाळे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कोणाच्या घरावरुन तर कोठे रस्त्याच्या मधोमध ओढलेल्या वीज तारांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.साखलाप्लॉट भागात हजारो नागरिकांनी महावितरण कंपनीकडून विजेची जोडणी घेतली आहे; परंतु, वीज जोडणी देताना महामंडळाने कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. परिणामी एका वीज खांबावरुन ५० ते ६० वीज जोडण्या दिल्याने अक्षरश: वीज तारांचे जाळे या भागात झाले आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण परिसरात मोजकेच विजेचे खांब असून या खांबावरुन वाहून नेलेल्या वीज वाहिनीला आवश्यक तेवढा ताण दिला नसल्याने रस्त्यावर हाताला येईल इतक्या अंतरावर वीज तारा लोंबकळात आहेत. अनेक वेळा या वीज तारा तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. साखला प्लॉट भागात सुमारे ५०० ते ६०० कुटुंबाची वसाहत दररोज वीज तारांच्या सहवासात धोकादायक पद्धतीने जीवन जगत आहेत. या परिसरातील विजेच्या तारांविषयी वारंवार तक्रारी करण्यात आल्या. वीज तारांना ताण देऊन या भागात विजेच्या खांबाची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात आली; परंतु, महावितरण कंपनीचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका वाढला आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते. अनेक नागरिकांच्या घराला वीज तारा चिटकल्या असून नागरिकांनीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लाकडांच्या सहाय्याने या तारांना ताण दिला आहे. त्यामुळे वीज तारांचा प्रवाह कधी घरात उतरेल, याचा नेम नाही. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन साखला प्लॉट भागातील नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.विजेचे खांब वाकल्याने वाढला धोका !साखला प्लॉट परिसरात विजेचे खांब जागोजागी वाकले आहेत. त्यामुळे वीज तारा रस्त्यावर लोंबकाळत असून येथील नागरिकांबरोबरच या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही धोका निर्माण झाला आहे. परभणी शहरातील या धोकादायक स्थितीकडे मात्र महावितरणचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत.
परभणी : येथे रोजच चालतो वीज तारांशी जिवाचा धोकादायक खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:39 AM