लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): शहरातील काही औषधी दुकानांवर कालबाह्य झालेल्या औषधींची विक्री होत असल्याचा प्रकार रुग्णाच्या एका नातेवाईकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी होत नसल्याने शहरात रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरु आहे.गंगाखेड शहरामध्ये काही ठिकाणच्या औषधी विक्री दुकानांवर फार्मासिस्ट नसलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु, या दुकानांविरुद्ध कुठलीही कार्यवाही होत नाही. तसेच औषधी दुकानांमध्ये औषधींच्या साठ्याचीही नियमितपणे तपासणी केली जात नसल्याचे दिसत आहे.येथील नागनाथ गोरगिळे यांच्या मुलाला ताप येत असल्याने २० फेब्रुवारी रोजी त्यांनी बालरोग तज्ज्ञाकडे उपचारासाठी नेले. यावेळी डॉक्टरांनी मुलास तपासून औषधी लिहून दिली. गोरगिळे यांनी याच रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधी खरेदी केली. त्यावेळी गोरगिळे यांनी दुकानदाराकडे पावती मागितली; परंतु, त्यांना पावती देण्यात आली नाही. त्याच दिवशी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मुलाला हे औषध दिल्यानंतर काही वेळातच ताप कमी होण्याऐवजी जुलाब सुरु झाले. त्यामुळे नागनाथ गोरगिळे यांनी दिलेल्या औषधीची एक्सपायरी डेट तपासली असता कालबाह्य झालेले हे औषध असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकानमालकाला फोन लावला; परंतु, ते बाहेरगावी होते. गोरगिळे यांना दिलेले औषध नोव्हेंबर २०१८ पर्यतच्या मुदतीचे होते.या सर्व प्रकारानंतर गोरगिळे यांनी औषधी दुकानात जावून विचारणा केली असता दुकानावर असलेल्या मुलाने कालबाह्य झालेले औषध बदलून दिले.मात्र दुकानाची पाहणी केली असता याच कंपनीचा मोठा साठा असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोरगिळे यांनी या सर्व प्रकाराचे छायाचित्रण करुन अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. औषधी दुकानांवर चालणारा हा गैरप्रकार थांबवावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.तपासणीला खो४शहरातील औषधी दुकानांची अन्न व औषधी प्रशासनाकडून नियमित तपासणी होणे आवश्यक आहे; परंतु, मागील काही महिन्यांमध्ये तपासणी होत नसल्याचे दिसत आहे. त्यातूनच कालबाह्य औषधींच्या विक्री सारखे प्रकार समोर येत आहेत. रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा हा प्रकार असून अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.फार्मासिस्ट विनाच औषधांची विक्री४औषध विक्रीच्या दुकानांवर फार्मासिस्ट असणे बंधनकारक आहे. फार्मासिस्टच्या माध्यमातूनच औषधांची विक्री करावी, असे नियम असताना अनेक दुकानांमध्ये फार्मासिस्ट नसलेल्या व्यक्तीला नियुक्त केले जाते. परिणामी औषध विक्री करताना चुका होऊन रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा फार्मासिस्ट नसलेल्या औषधी विक्रीच्या दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
परभणी : गंगाखेडमध्ये मुदतबाह्य औषधींची होतेय विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:23 AM