लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली.तालुक्यात झोला परिसरातील धारखेड शिवारात वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे. २९ एप्रिल रोजी दुपारी काही ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार स्वरुप कंकाळ, नायब तहसीलदार किरण नारखेडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, विनोद मुळे, संतोष इप्पर आदींच्या पथकाने दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी ३ ट्रॅक्टर व २ ट्रॅल्या पथकाने ताब्यात घेतल्या. काही ट्रॅक्टरचालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
परभणी : वाळू उपसा करणारी वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 1:28 AM