लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात या कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.परभणी शहरामध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने शहरवासियांना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. महापालिका प्रशासनाने अशाही परिस्थितीत पाणीपुरवठा सुरु ठेवला आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिनी पोहचली नसल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नळ योजनेद्वारे १४ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी खालावले आहे. तर नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ज्या येलदरी धरणात पाण्याचे आरक्षण केले आहे. त्या धरणातही पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसाठी पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. सध्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे; परंतु, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या कृती आरखड्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाच्या कामांना निधीच्या दुष्काळाचा फटका बसत आहे.परभणी महापालिकेने विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार १६ आॅक्टोबर रोजी शहरात टंचाई निवारणाच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर ४ कोटी ४२ लाख ५९ हजार रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. सहा महिन्यांपासून हा आराखडा वरिष्ठ पातळीवर सादर केला असला तरी अद्याप आराखड्यातील एकाही कामास मंजुरी मिळाली नाही. या कामांना फेब्रुवारी महिन्यात मंजुरी मिळाली असती तर आतापर्यंत कामे पूर्ण होऊन नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळाला असता. मात्र निधीच उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे सद्यस्थितीला ठप्प पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. मनपाकडून टंचाई कृती आराखड्याच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र निधी मिळत नसल्याने कामे ठप्प आहेत.२७ टँकर सुरु४कृती आराखड्यातील प्रस्तावांना मंजुरी मिळाली नसली तरी शहरात प्रत्यक्षात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याने मनपाने २७ टँकर सुरु केले असून याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा निधी वरिष्ठस्तरावरुन प्राप्त झाला नाही तर महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नातून हा निधी खर्च करावा लागणार आहे.असे केले होते नियोजनशहरात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने आॅक्टोबर महिन्यातच नियोजन केले आहे. त्यामध्ये शहरातील १० विहिरींचे खोलीकरण करुन त्यातील गाळ काढणे, या विहिरींना सुरक्षा जाळी बसविण्याच्या कामासाठी २३ लाख ७६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात १०० मीटरपर्यंत एचडीपीई जलवाहिनी टाकण्यासाठी ५३ लाख ८१ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये १२ हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर आणि ६ हजार लिटर क्षमतेचे ३५ टँकर लावून फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात शहरवासियांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. तसेच शहरातील २३३ विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपये आणि प्रत्येक प्रभागात चार या प्रमाणे १६ प्रभागांमध्ये नवीन विंधन विहीर घेऊन त्यावर सबमर्सिबल पंप बसविण्यासाठी ५४ लाख ५६ हजार रुपये प्रस्तावित केले आहेत. हा कृती आराखडा वरिष्ठ स्तरावर पाठवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आणखी तीन महिने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे; परंतु, अद्यापही कृती आराखड्याला मंजुरी मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत.दोन वर्षापासून मिळेना निधी४पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाकडून प्राधान्य दिले जात असले तरी महापालिकेच्या बाबतीत मात्र शासन दुजाभाव करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून मनपा टंचाई कृती आराखड्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवित आहे. मात्र या प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही. सलग तिसºया वर्षी कृती आराखड्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; परंतु, मागील दोन वर्षांच्या अनुभवाची पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
परभणी : मंजुरीअभावी रखडली टंचाई निवारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:12 PM