लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकांसह पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने २४ डिसेंबर रोजी पालकांनी शाळेतील मुलांना घरी नेवून चक्क शाळेवर बहिष्कार टाकला़ शिक्षक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे़वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवी वर्गात ८६, सहावीच्या वर्गात ४१, सातवीच्या वर्गात ८१, आठवी ३६, नववीत ५४ आणि दहावीच्या वर्गात ४० असे २३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ एक वर्षापासून मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक, लिपिक, परिचर ही पदे रिक्त आहेत़ या शाळेत शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्याथ्यांचे नुकसान होत आहे़ तेव्हा रिक्त पदांच्या जागी शिक्षक द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती़ शनिवारपर्यंत शिक्षकांची नियुक्ती न झाल्यास सोमवारी आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात दिला होता़ मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही़२४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळा उघडली़ मात्र विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने पालकांनी शाळेत येऊन शाळा सोडून देत शाळेवर बहिष्कार टाकला़ शिक्षण विभागाकडून जोपर्यंत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही़, तोपर्यंत शाळेत विद्यार्थी पाठविणारच नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे़
परभणी : वाघळा येथे पालकांनी शाळेवरच घातला बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:25 AM