लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेच्या पथकाने शहरातील दोन दुकानांवर शुक्रवारी दुपारी कारवाई करीत २२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत. याबाबत संबंधित दुकानमालकांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.शहरातील कडबीमंडी भागातील व्यापारी संजय चौगुलवार यांच्या दुकानात १५० किलो प्लास्टिकच्या कॅरिबॅग मनपाच्या पथकाला आढळून आल्या. प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत व्यापारी चौगुलवार यांना २५ हजारांचा दंड ठोठावून तो वसूल करण्यात आला. त्यानंतर दुसरी कारवाई गांधी पार्क भागात करण्यात आली. येथील व्यापारी शिवाजी मते यांच्या दुकानात ७० किलो प्लास्टिक कॅरिबॅग आढळून आल्या. यावेळी मते यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई उपायुक्त विद्या गायकवाड, विनय ठाकूर, स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या पथकाने केली.
परभणीत २२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:45 AM