लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुंबई येथील सेवाभावी संस्थेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरात दोन ठिकाणी ८ लाख ८७ हजार रुपयांच्या बनावट सिगारेटचा साठा जप्त केला असून, या प्रकरणी नानलपेठ आणि कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शासनाची परवानगी न घेता तसेच शासनाने निश्चित करुन दिलेला वैधानिक इशारा प्रकाशित न करता सिगारेटची विक्री शहरात होत असल्याची तक्रार १३ जानेवारी रोजी मुंबई येथील एका सेवाभावी संस्थेने पोलिसांकडे केली होती. या तक्रारीनंतर सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दोन ठिकाणी छापे टाकले होते. नवा मोंढ्यातील एका जर्दा दुकानावर पोलिसांनी टाकलेल्या कारवाईत सिगारेटचे ८८० बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ७० हजार रुपये एवढी आहे. या प्रकरणी आरोपी शेख अखिल शेख जमील आणि शेख शकील शेख जमील या दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.स्टेशन रोडवरील एका जर्दा दुकानावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत अशा प्रकारच्या प्रतिबंधीत असलेल्या व आरोग्यास हानीकारक असलेल्या ७ प्रकारच्या सिगारेटचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात गुडन गरम सिगारेटचे ४८ बॉक्स (१ लाख ९२ हजार रुपये), ब्लॅक सिगारेटचे ५० बॉक्स (१ लाख ५० हजार रुपये), पॅरीस सिगारेटचे ११ बॉक्स (३३ हजार रुपये), ए-१० या नावाच्या सिगारेटचे २०० बॉक्स (२ लाख २५ हजार रुपये), रुली रिव्हर सिगारेटचे ९ बॉक्स (२७ हजार रुपये), के.१ गरम नावाच्या सिगारेटचे १०० बॉक्स (५० हजार रुपये) असे एकूण सिगारेटचे ५४३ बॉक्स जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सिगारेटची किंमत ८ लाख १७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात मो. अली मो. युसूफ अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड हे तपास करीत आहेत.
परभणी : पावणेनऊ लाखांच्या सिगारेटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:50 PM