लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पाथरी तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सर्व योजनांचा एकत्रिकरणाचा आराखडा तयार करून विकासकामे होणार आहेत.महाराष्टÑ शासन व जागतिक बँकेच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्र्रकल्पांतर्गत ‘पोकरा’ गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी गाव निवड करण्याचे धोरण निश्चित केले आहे. पाथरी तालुक्यातील हादगाव बु., वरखेड, किन्होळा, खेर्डा, सारोळा, रेणाखळी, वडी, बांदरवाडा, देवनांद्रा, निवळी, पाटोदा या ११ गावांची पोकरा प्रकल्पामध्ये निवड करण्यात आली. या गावांमध्ये सरपंचाच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समिती काम करणार असून कृषी, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान या प्रकल्पात राहणार आहे. हवामान आधारित या प्रकल्पाचे काम चालणार असून पाणलोट, ढाळी बांध, सिंचन विहीर, विहीर पूनर्भरण, कुक्कुट पालन, शेळी पालन, मच्छ पालन यासह विविध योजना एकत्रित करून त्याचा वैयक्तिक व सामूहिक लाभ या दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करून या आराखड्याला या प्रकल्पांतर्गत मंजुरी देण्यात येणार आहे. हा प्रकल्प पाच वर्ष चालणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे या ठिकाणी केली जाणार आहेत.इतर गावांचा समावेश करण्यासाठी प्रयत्नगावांचा विकास अनुशेष भरून काढण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा महत्त्वपूर्ण असून नियोजनपूर्वक या प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. पाथरी तालुक्यातील इतर गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
परभणी : ‘कृषी संजीवनी’साठी ११ गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:54 PM