लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.सेलू शहराला निम्न दुधनाप्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षापूर्वी २५ वर्षाचे पाणी नियोजन करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, शहरातील अंतर्गत पाईप लाईन तसेच प्रकल्पाजवळ पंप हाऊस व एक्स्प्रेस फिडर आणि पाणी उपसा करण्यासाठी देवला परिसरात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या. त्याद्वारे पंपहाऊसमध्ये पाणी आणून शहरातील ६ जलकुंभांत सोडले जाते. नगरपालिकेने शहराच्या विविध भागांत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ६ झोन तयार करून २ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात ३५०० नळ कनेक्शन आहेत. बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्याने पालिकेने एक महिन्यापासून पाणी सोडण्याची वेळ कमी केली आहे. सध्या काही भागात १ तास तर काही परिसरात १० मिनिटे कमी असे नियोजन केले असून सध्या तरी शहराला पाणीटंचाई जाणवत नाही.दुधना : प्रकल्पाने तारले४यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि प्रकल्प मृत साठ्यात गेला. तरीही सेलू शहराला जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. कारण यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित केला आहे.न.प.च्या पाण्यावर मदारअत्यल्प पावसामुळे शहरातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हातपंप व विधंन विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. आगामी काळात आणखी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पाण्यावरच शहर वासियाची मदार राहणार आहे.शहरातील नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात लवकर पालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे. जलवाहिनीचे काम लवकरच करण्यात येईल. सद्य स्थितीत १५ इंटेकवेल पैकी ५ वेल पाण्याखाली आहेत. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी टंचाई भासू देणार नाही.-देविदास जाधव, मुख्याधिकारी
परभणी: सेलूला दररोज हवे २६ लाख लिटर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:54 PM