लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पुनर्वसित निळा गावात जि.प. ची सातवीपर्यंत शाळा आहे; परंतु, या सात वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ चारच वर्गखोल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तीन वर्गाच्या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात ज्ञानार्जन करावे लागत आहे.पूर्णा नदीकाठावर असलेल्या जुन्या निळा गावाचे पुनर्वसन झाले. अनेक वर्षांच्या प्रवासानंतर अखेर गावातील ग्रामस्थांना दोन वर्षापूर्वी पुनर्वसित गावात घरे मिळाली. या योजनेत शाळेचा सहभाग नसल्याने तत्कालीन महिला सरपंच कमलबाई सूर्यवंशी यांनी प्रयत्न करुन सर्व शिक्षा अभियानांतर्गत गावात चार वर्ग खोल्यांचे बांधकाम करुन घेतले आहे. जुने गाव सोडून नवीन गावात गावकऱ्यांचे स्थलांतर झाल्याने नवीन गावात शाळा भरु लागली. निळा येथे जि.प. ची पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत १९९ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेसाठी चारच वर्ग खोल्या असल्याने उर्वरित तीन वर्गातील विद्यार्थ्यांना उघड्यावरच बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे. याशिवाय शाळेत स्वच्छतागृहाचा अभाव असून विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. यासंबंधी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वर्गखोल्यांची मागणी केली; परंतु, प्रशासकीय स्तरावर याबाबत कोणतीच हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळेला वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे जि.प. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देऊन तीन वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य दिगंबर सूर्यवंशी केली आहे.
परभणी : चार वर्गखोल्यांत भरतात सात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:34 AM