लोकमत न्यूज नेटवर्केसोनपेठ (परभणी): तालुक्यात २१ आॅक्टोबर रोजी सकाळी व रात्री झालेल्या पावसामुळे शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सात गावांचा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोेरे जावे लागले.एकीकडे केंद्र व राज्य शासन ग्रामस्थांना दळण-वळणाच्या सेवा व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च करीत आहे. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक चांगले रस्ते तयार करण्यात आले आहेत.दुसरीकडे मात्र शेळगाव येथून वाहणाऱ्या फाल्गुनी नदीला २१ आॅक्टोबर रोजी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे हे पाणी शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलावरून वाहत होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांतील ग्रामस्थांना सोनपेठ शहर गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.विशेष म्हणजे जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना पायी व वाहनातून मार्ग काढावा लागला. शेळगाव, उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून ऐरणीवर आहे. थोडासा पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहते. परिणामी तालुक्यातील उक्कडगाव, गंगापिंपरी, गोळेगाव, लासीना इ. गावांचा वारंवार संपर्क तुटतो. हा पूल नव्याने उभारावा, यासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे; परंतु, या मागणीचा विचार होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ेसात : गावांचा निवडणुकीवर बहिष्कार४सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सात गावांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील अरूंद पुलावरून पाणी आल्याने सात गावांचा सोनपेठ शहराशी संपर्क तुटला.४विशेष म्हणजे या सर्व गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा तालुका, जिल्हा प्रशासनाकडे रस्त्याच्या प्रश्नासाठी साकडे घातले; परंतु, जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखविली. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सात गावांतील ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केलेच नाही.ग्रामस्थांत तीव्र संताप४सोनपेठ तालुक्यातील उक्कडगाव, गंगा पिंपरी, गोळेगाव, लासीना इ. सात गावांतील ग्रामस्थांना पावसाळ्यातील चार महिने शेळगाव-उक्कडगाव रस्त्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
परभणी : परतीच्या पावसाने सात गावांचा तुटला संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:40 PM