लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने मंगळवारी खरीप २०१८ हंगामातील दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी घोषित केली. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.परभणी जिल्ह्यात सरासरीच्या फक्त ६७ टक्के पाऊस झाला आहे. त्यातच पावसात सातत्य राहिले नसल्याने पाणीपातळीत फारसी वाढ झालेली नाही. त्यामुळे खरीपातील पिके हातची गेली आहेत. शिवाय रब्बीच्या पेरण्याही थांबल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मंगळवारी दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची नावे घोषित केली आहेत. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश आहे. त्यात पाथरी, मानवत व सोनपेठ या तीन तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे नमूद करण्यात आले असून परभणी, पालम व सेलू या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता या तालुक्यांना दुष्काळाच्या सवलतींचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथकही जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगामी कालावधीत येणार आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी गंगाखेड, पूर्णा व जिंतूर हे तीन तालुके मात्र या यादीतून वगळण्यात आले आहेत. या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या निकषापेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचा प्रशासनाचा प्रारंभीचा अहवाल आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांना सध्यातरी दुष्काळाच्या सवलती मिळणार नाहीत.दुष्काळी भागाची पालकमंत्र्यांकडूनआज पाहणीराज्य शासनाने दुष्काळी तालुके जाहीर केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील २४ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यानुसार बुधवारी सकाळी ८.३० वाजता ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात पाणी आरक्षणाबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, लिंबा, सोनपेठ तालुक्यातील दुधगाव, वाणीसंगम या गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर सोनपेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पालकमंत्री जळगावकडे रवाना होणार आहेत.‘दुष्काळग्रस्त यादीत ३ तालुके समाविष्ट करा’जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड व पूर्णा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश करावा, अशी मागणी २३ आॅक्टोबर रोजी आ. बाबाजानी दुर्राणी, आ. विजय भांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड व पूर्णा या तीन तालुक्यातील परिस्थिती दुष्काळग्रस्त असताना प्रशासनाने उपग्रहाद्वारे केलेले सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने राज्य शासनाकडे सादर केले. त्यामुळे या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळण्यात आले; परंतु, या तीन तालुक्यातील शेतकºयांच्या हाती खरीप हंगामातील पिकातून अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. त्याच प्रमाणे रबी हंगामातील पेरणीही झालेली नाही. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा,अशी मागणी आ. बाबाजानी दुर्राणी व आ. विजय भांबळे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणीस यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केली आहे.सहाही तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानदुष्काळाच्या दुसºया यादीमध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश होता. या सहा तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने रॅडम पद्धतीने १० टक्के गावे निवडून सत्यमापन चाचणी घेतली होती. या चाचणीचा अहवालही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून सहाही तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान असलेले तालुके तीव्र स्वरुपाच्या दुष्काळात मोडतात. दरम्यान, मंगळवारी राज्यातील गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यांची यादी शासनाने जाहीर केली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ, मानवत या तीन तालुक्यांचा समावेश झाला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सत्यमापन चाचणीत उर्वरित पालम, परभणी आणि सेलू या तालुक्यातही ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले.
परभणी : मानवत, पाथरी, सोनपेठमध्ये गंभीर दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:01 AM