लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरासह जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यामध्ये मुले पकडणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरल्याने पालकांची झोप उडाली आहे़ परभणी शहरात तर नागरिकांनी सोमवारची रात्र जागून काढली़ सोनपेठमध्ये अफवांमुळे शाळेत गेलेल्या मुलांना घरी परत नेण्यासाठी अचानक पालकांची गर्दी झाली़ या सर्व अफवांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ त्यातच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास मारहाणीसारखे प्रकार होत आहेत़ या सर्व पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ही अफवा पसरली आहे़ मुलांना पळवून नेण्याची घटना घडली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पेव फुटले आहे़ परभणी शहरात देखील मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत़ मुलांना पळविणारी टोळी जिल्ह्यात दाखल झाली आहे़ अशा स्वरुपाची ही अफवा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़या भीतीतूनच सोमवारी रात्री शहरातील दर्गा रोड परिसरातील झमझम कॉलनीत नागरिकांनी रात्र जागून काढली़ दरम्यान, मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयावरून एका व्यक्तीस मारहाण झाल्याची घटनाही याच भागात घडली़ शहरात अफवा पसरल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ होत आहे़ ठिकठिकाणी गस्त घालून जनजागृती केली जात आहे़विद्यार्थ्यांना शाळेतून आणले घरीसोनपेठ तालुक्यात अशीच अफवा पसरली असून, मंगळवारी या अफवेमुळे शाळांमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालकांची गर्दी झाली होती़ पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरिकांना केले आहे़ १९ जून रोजी सोनखेड परिसरातून एक मुलगा पळविल्याची अफवा शहरात पसरली़लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय झाल्याचे संदेश सोशयल मीडियातून फिरत आहेत़ अनोळखी व्यक्ती आढळली तर तातडीने पोलिसांना माहिती द्यावी़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पो.नि .सोपान सिरसाठ यांनी केले आहे़जिंतुरात फिरस्त्यांची चौकशीजिंतूर तालुक्यातही ही अफवा पसरली आहे़ अनेक जण या अफवेच्या अनुषंगाने पोलिसांना माहिती देत आहेत़ अफवांवर विश्वास ठेवू नये, संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़त्याचबरोबर छोट्या व्यवसायासाठी बाहेर गावाहून शहरात आलेल्या फिरस्त्यांची चौकशी जिंतूर पोलिसांनी केली़ उपविभागीय अधिकारी अनिल घेर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सुरेश नरवडे यांनी पथकामार्फत शहरात भटक्या नागरिकांची तपासणी केली़अशोक घोरबांड यांची होर्डिंग लावून जनजागृतीपोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी बसस्थानक, जांब नाका, आझम चौक आणि पारवा गेट अशा चार ठिकाणी मोठे होर्डिंग लावून नागरिकांना आवाहन केले आहे़ फिरस्ती, भिकारी, वेडसर, अनोळखी व्यक्तींना मारहाण करू नये, तसेच कायदा हातात घेऊ नये, संशयास्पद व्यक्ती आढळली तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे़अफवांवर विश्वास ठेवू नका- परदेशीअफवांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासणी केली़ मात्र कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही़ ही केवळ अफवा आहे़ सर्व फिरस्ती लोकांच्या चौकशीचे कामही सुरू आहे़ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डीवायएसपी संजय परदेशी यांनी केले आहे़ तसेच संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा पोलीस नियंत्रण कक्ष ०२४५२-२२६२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे़
परभणी : मुले पळविण्याच्या अफवा पसरल्याने पालकांची उडाली झोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:13 AM