लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तब्बल ५१ वर्षांचे आयुर्मान असलेल्या येलदरी धरणाची सद्यस्थिती पडताळण्यासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा समितीच्या पथकाने नुकताच येलदरीचा दौरा करुन या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे.देशाच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेत परभणी जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी येथे १९५८ मध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर परिसरातील २४ गावांमधील ७ हजार ३०० हेक्टर शेत जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. तब्बल १० वर्षाच्या अथक परिश्रमानंतर १९६८ साली हे धरण बांधून पूर्ण झाले. ९३४ दलघमी पाणीसाठवण क्षमता या धरणाची आहे. या धरणावर एकूण १० दरवाजे उभारण्यात आले असून त्यापैकी ५ दरवाजे परभणी जिल्ह्याच्या हद्दीत तर ५ दरवाजे हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. जवळपास ५१ वर्षे पूर्ण झालेल्या या धरणाची सद्यस्थिती काय आहे, याची पडताळणी नाशिक येथील धरण सुरक्षा समितीकडून करण्यात येते. त्या अनुषंगाने २८ मार्च रोजी या समितीच्या ५ जणांच्या पथकाने येलदरी येथे येऊन या धरणाची पाहणी केली. त्यामध्ये धरणाच्या बांधण्यात आलेल्या भिंतीची सद्यस्थिती काय आहे, मातीच्या भिंतीच्या आतून पाझरणारे पाणी योग्य प्रमाणात आहे की नाही, धरणाचा मुख्य गाभा व्यवस्थित आहे की नाही, पावसाळ्यात धरणाचे कोणते काम करावे लागते, या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली. जलसंधारण विभागाच्या वतीने ही नियमित पडताळणी असल्याचे सांगण्यात आले असले तरी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या धरणाकडे शासनाचे लक्ष नाही. धरणाची कोणतीही वार्षिक दुरुस्ती, देखभालीची कामे केली जात नाहीत. शिवाय धरणाच्या दरवाजांचे मेंटनन्सही नियमित केले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर या पथकाने स्ट्रक्चरल आॅडीट केले आहे.४येलदरी धरणाला एकूण ५ भिंती असून त्यापैकी एक मुख्य दगडी भिंत आहे. तर चार मातीच्या भिंती आहेत. दगडी भिंतीमध्ये झाडे आल्याने काही भिंतीचे काही दगड ढासाळले आहेत. त्यामुळे या भिंतींनाही धोका निर्माण झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.४पाच सदस्यीय समितीकडून या धरणाचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले असले तरी या बाबतचा अहवाल अद्याप राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला नाही.
परभणी: ‘येलदरी’चे आयुर्मान पडताळण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:17 PM