अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पाथरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवण्याचा या पक्षाच्या नेत्यांनी हट्ट कायम धरला असून गंगाखेडच्या जागेवरही सेनेकडून दावा केला जात आहे. या संदर्भात रविवारी मुंबईत पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या वतीने चारही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. शिवसेनेकडून मात्र अशी कोणतीही प्रक्रिया सुरु झाली नव्हती. त्यामुळे इच्छुक मंडळी स्वत:हूनच कामाला लागली होती. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास चार ते पाच दिवसांचाच कालावधी बाकी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी मुंबई येथे परभणी जिल्ह्यातील ३ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी शनिवारी इच्छुक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना झाले. परभणी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील हे करीत आहेत. ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना मुलाखतीची आवश्यकता राहणार नाही. त्यांची उमेदवारी निश्चित आहे. मतदारसंघात ते विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करीत आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या तीन विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होतील.सर्वात मोठी चुरस पाथरी विधानसभा मतदारसंघात आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून दोन वेळा विजय मिळविला आहे. लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघाने शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मते दिली. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला पाहिजे, यासाठी पक्षाचे नेते प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. पाथरीचे आ.मोहन फड हे अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर खा.बंडू जाधव यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला. आता भाजपाकडून त्यांनी पाथरीच्या जागेवर उमेदवारी मागितली आहे. त्यांची भाजपाकडूनची उमेदवारी निश्चित असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत आ.मोहन फड यांनी खा.बंडू जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांचा उघड प्रचार केला होता. विशेषत: मानवत येथील नगरपालिका आ.फड यांच्या ताब्यात असताना खा.जाधव यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळाले होते. आ. फड यांनी लोकसभेच्या वेळेस घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आता राज्यस्तरावरुन शिवसेना-भाजपाची युती झाली आणि पाथरीची जागा भाजपाला सुटली तर लोकसभेला ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात काम केले, त्यांच्यासाठी आम्ही विधानसभेला कसे काय काम करायचे? असा सवाल शिवसेनेचे कार्यकर्ते करीत आहेत. शिवसैनिकांच्या बैठकीत खा.जाधव यांनी वरिष्ठ जो निर्णय देतील, त्यानुसार काम करु, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात आ.फड यांच्या विषयी खा.जाधव यांची तीव्र नाराजी आहे. लोकसभेचा बदला विधानसभेला घेण्याच्या इराद्याने खा.जाधव हे मैदानात उतरले आहेत. मतदारसंघातील विविध बैठकांमध्ये ते भाषणात आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. त्यांच्या भूमिकेला शिवसैनिकांचे समर्थन मिळत असल्याने कोणत्याही परिस्थितीत पाथरीची जागा सेनेकडेच ठेवून घ्यायची, यासाठी शिवसैनिकांचा हट्ट कायम आहे. शिवाय शिवसेनेकडे आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असलेल्या इच्छुक उमेदवारांची फौजही तयार आहे. याशिवाय जुने काही निष्ठावंत शिवसैनिकही विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा बाळगून आहेत; परंतु, निवडणुकीत जिंकण्याचे मेरिट लक्षात घेऊनच उमेदवारीबाबत विचार होणार असल्याचे समजते.दुसरीकडे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपातील महायुतीतील घटकपक्ष रासपाकडे असला तरी या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे हे अद्यापही शेतकरी फसवणूक प्रकरणातून कारागृहातून बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी ही जागा शिवसेनेला सोडावी, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेला जवळपास ४० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. या मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळेच ही जागा शिवसेनेसाठी आवश्यक आहे, असा दावा, कदम समर्थक करीत आहेत. याच अनुषंगाने रविवारी जिल्हाप्रमुख विशाल कदम मुंबईत मुलाखत देणार आहेत. अन्य दोन ते तीन जण या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे समजते. याशिवाय जिंतूर मतदारसंघातून जि.प.सदस्य राम खराबे हे इच्छुक आहेत; परंतु, लोकसभा निवडणुकीत खा.संजय जाधव यांनी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांना विधानसभेला मदत करण्याचा शब्द दिला होता. बोर्डीकर यांनी लोकसभेला जिंतूर मतदारसंघातून शिवसेनेला मोठी आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे खा.जाधव हे दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी बोर्डीकर यांचेच समर्थन करु शकतात. त्यामुळे जिंतूरची जागा युतीनुसार भाजपाकडेच राहण्याची शक्यता आहे व येथून भाजपाच्या युवा नेत्या मेघना बोर्डीकर याच उमेदवार राहतील, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे. त्यामुळे कदाचित जि.प.सदस्य राम खराबे यांना शांत राहण्यास खा.जाधव सांगू शकतात. विशेष म्हणजे खराबे हे खा.जाधव यांचेच समर्थक आहेत. त्यामुळे खा.जाधव यांचा शब्द ते प्रमाण मानतील, अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिंतूर वगळता परभणी, पाथरी आणि गंगाखेड या तीन विधानसभा शिवसेनेकडे कायम ठेवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून सुरु आहे. शिवसेना- भाजपाचे जागावाटपाचे सूत्र अद्यापही जाहीर झाले नसल्याने कोणती जागा कोणाकडे राहणार, हे अनिश्चित असले तरी ज्या प्रमाणे भाजपाने चारही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तशीच रणनिती शिवसेनेकडून जिल्ह्यात आखली जात आहे. आता रविवारच्या मुलाखतीच्या वेळी मुंबईत कोणता नेता कसे शक्तीप्रदर्शन करतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीचे माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांची झाली गोची४माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी विटेकर यांच्यासाठी आ.मोहन फड यांनी शिवसेनेसोबतचा युतीधर्म बाजुला ठेवून उघडपणे प्रचार केला; परंतु, विटेकर यांना यश मिळाले नाही. आता विधानसभेची निवडणूक सुरु झाली आहे. आ.फड हे भाजपाकडून निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.४असे झाले तर लोकसभा निवडणुकीत आ.फड यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून राजेश विटेकर यांना फड यांना मदत करावी लागेल. या उलट या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांनीही विटेकर यांच्यासाठी लोकसभेला प्रचाराचे रान उठविले होते. आता वरपूडकर आणि आ.फड हे आमने-सामने राहणार आहेत.४त्यामुळे या दोन नेत्यांपैकी कोणाची मदत करावी, या कात्रीत विटेकर सापडले आहेत. सद्यस्थितीत विटेकर हे आ.फड यांच्या काही कार्यक्रमात दिसत असले तरी राज्यस्तरावर काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी असल्याने त्यांना पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार विधानसभेला वरपूडकर यांचा प्रचार करावा लागेल. त्यावेळी विटेकर यांची काय भूमिका राहील, याबाबत जिल्हावासियांमध्ये उत्सुकता लागली आहे.
परभणी : पाथरीच्या जागेचा हट्ट कायम; गंगाखेड विधानसभेवरही दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:46 PM