परभणी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. गुलाब भगवानराव जीवने (२४, रा. कौसडी, ता. जिंतूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुलाब जीवने यांनी एका फायनान्सच्या कंपनीचे कर्ज घेतले होते. सोयाबीन उत्पन्नातून कर्जफेड करू असे वाटले. मात्र अतिवृष्टीने सोयाबीनही वाया गेले. त्यामुळे त्रस्त होऊन स्वतच्या शेत आखाड्यावर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील दाखल केले. परंतु विष अंगात जास्त प्रमाणात पसरल्याने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी परभणी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
गुलाब यांना तात्काळ जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचार यादरम्यान रात्री ९ च्या सुमारा गुलाब जीवने यांचा मृत्यू झाला. गुलाब यांच्या वडिलांचा काही दिवसापूर्वीच सर्प दंश ने मृत्यू झाला होता. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी गुलाब जीवने यांच्यावर आली होती. कुटुंबाचा गाळा ढकलत फायनान्सचे कर्ज कसे फेडावे व हातात आलेले सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेल्यामुळे या शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब सध्या उघड्यावर आले असून कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी होत आहेत.