लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नामनिर्देशनपत्रावर बनावट स्वाक्षरी केल्याचा जाब विचारणाऱ्या नगरसेविकेच्या मुलास जातीवाचक शिवीगाळ करून फसवणूक केल्या प्रकरणी परभणी येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाने भाजपाचे जिंतूर येथील नेते सुरेश नागरे यांच्या विरूद्ध अॅट्रॉसिटी व फसवणुकीचा सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गतवर्षी झालेल्या निवडणुकीच्या वेळी जिंतूर येथील नगर परिषदेच्या सदस्या पार्वती बहिरट यांची नामनिर्देशन पत्रावर सुरेश नागरे यांनी बनावट स्वाक्षरी का केली? याचा जाब विचारण्यासाठी त्यांचा मुलगा चंद्रकांत बहिरट हा नागरे यांच्याकडे गेला होता़त्यावेळी सुरेश नागरे यांनी त्यास जातीवाचक शिवीगाळ करून बेईज्जत केले होते़ त्यानंतर चंद्रकांत बहिरट यांनी या प्रकरणी जिंतूर येथील पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती़ परंतु, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नाही़ त्यामुळे बहिरट यांनी परभणी येथील सत्र न्यायालयात धाव घेतली़ या प्रकरणी १६ जून रोजी परभणी येथील सत्र न्यायालयाचे न्या़ डी़व्ही़ कश्यप यांनी अंतिम युक्तीवादानंतर जिंतूर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना बहिरट यांच्या तक्रारीची दखल घेऊन सुरेश नागरे यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्या विरूद्ध तपास करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार १७ जून रोजी नागरे यांच्या विरोधात जिंतूर ठाण्यात फसवणूक व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परभणी : सुरेश नागरे यांच्यावर अॅट्रॉसिटी, फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:38 PM