लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहर महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना पाठिशी घातले जात असल्याच्या कारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अॅड.स्वराजसिंह परिहार यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.याबाबत अॅड. परिहार म्हणाले की, मनपातील स्वीकृत सदस्यपदाच्या एका जागेवर इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. याला विरोधी पक्षनेते विजय जामकर, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह १४ नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. तसे पत्रही प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी मनपा आयुक्तांना दिले होते. त्यामुळे इरफान आयुब मोहम्मद यांची नियुक्ती होणे अपेक्षित असताना महिनाभरापूर्वी झालेल्या मनपाच्या विशेष सभेत अतिक इनामदार यांच्या नावास अचानक मंजुरी देण्यात आली. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्याच सांगण्यावरुन इनामदार यांची निवड करण्यात आली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे पत्र डावलून इतरांची निवड कशी काय केली, असा सवाल केला होता. त्यानंतर याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी पक्षविरोधी कृती करणाऱ्यांवर कारवाई करु, असे आश्वासन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर जवळपास २० दिवसांचा कालावधी होत आला तरीही या प्रकरणी कारवाई होत नसल्याने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे अॅड. परिहार म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा पडली फूटराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि महानगर अध्यक्ष अॅड.स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मतभेद निर्माण झाले आहेत. आ.दुर्राणी हे परभणी शहरात अकारण हस्तक्षेप करतात, नगरसेवकांना काम करु देत नाहीत, असा अॅड.परिहार यांचा आरोप आहे. तर आ.दुर्राणी हे जिल्हाध्यक्ष असल्याने निर्णय घेत असल्याचे सांगत आहेत. यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीत जिल्ह्यात फूट पडल्याचे दिसून येत आहे.प्रमुख पदाधिकाºयांच्या मागणीची दखल घेतली जात नसेल आणि पदाला सन्मान दिला जात नसेल तर त्या पदावर राहून उपयोग काय? पक्ष स्थापनेपासून खा.शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या सोबत आहे. यापुढेही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार आहे.-अॅड. स्वराजसिंह परिहार
परभणी : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वराजसिंह परिहार यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 12:18 AM