लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : इंटरनेटचा वापर वाढत चालला असून, इंटरनेटमुळे अनेक चांगल्या बाबी घडत असतानाच याच इंटरनेटचा चुकीच्या कामांसाठीही वापर होत आहे़ त्यातून नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत़ ही बाब लक्षात घेता नागरिकांनी जागरुक होऊन काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी केले़महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने सायबर गुन्ह्यांविषयीची माहिती आणि घ्यावयाची काळजी याबाबत २३ जानेवारी रोजी कार्यशाळा घेण्यात आली़यावेळी संजय हिबारे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांची उपस्थिती होती़ प्रारंभी संजय हिबारे यांनी सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी? या विषयी माहिती दिली़ त्यानंतर परभणी येथील सायबर सेलचे बालाजी रेड्डी यांनी सायबर गुन्हे कोणत्या प्रकारचे आहेत, ते कसे घडतात, सायबर गुन्हे झाल्यानंतर कायद्यात शिक्षेची असलेली तरतूद आणि आपली फसवणूक होवू नये म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती दिली़इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, फेसबुक, व्हॉटस्अॅप, टेलीग्राम आदी ठिकाणी टाकल्या जाणाºया माहितीतून होणारे गुन्हे याविषयीची माहिती दिली़ मागील काही दिवसांपासून फोन कॉल करून बँक खात्याविषयीची वैयक्तीक माहिती, एटीएम कार्डाचे पीनकोड क्रमांक, ओटीपी नंबर मागवून फसवणूक केली जात आहे़ फिशिंग, हॅकींग, त्याचबरोबर आॅनलाईन नोकरीचे आमिष, विवाहाचे आमिष, विमा कंपन्यांचे आमिष दाखवून फसवणूक झाली आहे़ तसेच आॅनलाईन खरेदी करतानाही बनावट वेबसाईट तयार करून आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले असून, याबाबत काय काळजी घ्यावी, याची माहिती रेड्डी यांनी दिली़ यशस्वीतेसाठी संतोष व्यवहारे, राजेश आगासे, रवि भुमकर, गौस खान पठाण, राम घुले, गणेश कौटकर, मिलिंद तुपसमिंद्रे, प्रवीण भानेगावकर आदींनी प्रयत्न केले़मोबाईल गहाळची ४६२ प्रकरणेपरभणी येथील सायबर सेलने जिल्ह्यातील मोबाईल गहाळ झाल्याची ४६२ प्रकरणे हाती घेतली व सर्व मोबाईल शोधले़ मोबाईल चोरीच्या २७ गुन्ह्यांपैकी १२ गुन्ह्यांची उकल केली, अशी माहिती या कार्यशाळेत देण्यात आली़ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली २०१७ मध्ये १३ गुन्हे दाखल झाले होते़ त्यापैकी एक गुन्हा नांदेड पोलिसांकडे वर्ग केला असून, एका गुन्ह्यात चार्जशीट दाखल करून ११ गुन्हे तपासावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़
परभणी :सायबर फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:25 AM