लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी काढला आहे.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या यापूर्वी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बदल्या होत होत्या; परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या वेळापत्रकात सातत्याने बदल केले जात आहेत. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच आता शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने ८ मार्च रोजी कक्ष अधिकारी एस. एन. भंडारकर यांच्या स्वाक्षरीने आदेश काढण्यात आला आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक, निव्वळ रिक्त जागा, अनिवार्य रिक्त जागा यांच्या संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १९ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. २५ मार्चपासून प्रत्यक्ष शिक्षकांचे बदली अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व बाबी शिक्षकांना अवगत करण्यात याव्यात, असेही या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी ८ मार्च रोजीच ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिव प्रियदर्शना कांबळे यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदल्यांबाबत जे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले, त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बदलीपात्र शिक्षकांची व्याख्या करताना संबंधित शिक्षकाची सर्वसाधारण व अवघड क्षेत्रात १० वर्षाची सेवा असल्यास सदरील शिक्षक बदलीपात्र होतात. मात्र सर्वसाधारण श्रेणीतील बदलीपात्र शिक्षक एकदा बदली झाल्यानंतर जोपर्यंत अवघड क्षेत्रात जात नाहीत, तोपर्यंत असे शिक्षक बदलीपात्र ठरतात. नवीन धोरणानुसार त्यांची प्रतिवर्षी बदली होऊ शकते. औरंगाबाद खंडपीठात शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने न्यायालयाने एक मुद्दा उपस्थित केला होता. ज्यामध्ये बदलीपात्र शिक्षकाची नवीन धोरणानुसार प्रतिवर्षी बदली होऊ शकते. त्यामुळे त्या शिक्षकाला एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा बदली होण्यासाठी काही कालावधी निश्चित केला जाणार आहे काय, अशी विचारणा वकिलांना करण्यात आली होती. त्यावेळी शासनाच्या वतीने अशा बदलीपात्र शिक्षकांची संगणकीय प्रणालीद्वारे एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा ३ वर्षे त्या शिक्षकाची बदली केली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले.आता ८ मार्चच्या आदेशात या व्याख्येत बदल करुन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे. त्यात बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाच्या बदलीस निश्चित करायवाची सेवा १० वर्षे पूर्ण झाली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा किमान ३ वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षक बदलीपात्र ठरु शकतात, असेही ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांना अभय कायम४शिक्षक बदल्यांमध्ये संवर्ग १ व २ मधील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती देऊन गतवर्षी बदली करुन घेतली. अशा शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन त्यांना त्यांच्या मूळ शाळेवर परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. जिल्ह्यात असे २४ शिक्षक गतवर्षी आढळून आले होते. त्यापैकी १० शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली. उर्वरित १४ शिक्षकांना शिक्षण विभागाने गेल्या वर्षभरापासून अभय दिलेले आहे. या शिक्षकांवर कारवाई करण्याचे अधिकार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असताना परभणीतील मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा एकदा बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार आहे. गतवर्षीच कारवाई झाली नसल्याने पुन्हा खोटी माहिती देऊन बदलीचा खटाटोप होण्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून होताना दिसून येत आहे.
परभणी : शिक्षकांची बदली प्रक्रिया २५ मार्चपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:25 AM