लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (परभणी) : जिंंतूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागाची शाळा आहे. प्राथमिक गटात पहिली ते चौथी तर माध्यमिक गटामध्ये पाचवी ते दहावी या वर्गांचा समावेश आहे. पहिली ते चौथी या वर्गात १८२ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आठ पदांना मंजुरी दिली आहे. आठही शिक्षक येथे कार्यरत असताना मुख्याध्यापकाचे पद मात्र रिक्त आहे. त्यामुळे शिक्षकांंना शाळेत व प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.माध्यमिक गटामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गाचा समावेश आहे. या वर्गांमध्ये २७९ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने १० पदे मंजूर केली आहेत. मात्र या ठिकाणी ६ शिक्षकच कार्यरत असून ४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपलब्ध शिक्षकांंना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व हिंदी हे महत्त्वाचे विषय शिकविण्यासाठी वर्षभरापासून शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दोन महिन्यांवर दहावीच्या बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली आहे; परंतु, या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध नसल्याने गणित व विज्ञान विषयाचे ज्ञान आत्मसात करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या दोन महिन्यांसाठी तरी या शाळेला गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी माध्यमिक विभागाकडून शिक्षकांची नियुक्ती केली तर विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांनी लक्ष देऊन या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी होत आहे.विद्यार्थी संख्येवर: होतोय परिणामआसेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून गणित, विज्ञान व हिंदी विषय शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आपले पाल्य जि.प.च्या शाळेतून काढण्यास सुरुवात केली आहे.यापूर्वी पाचवी ते दहावी या वर्गात ४०० विद्यार्थी संख्या होती. मात्र शिक्षण विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे यावर्षी विद्यार्थी संख्या २७९ वर येऊन ठेपली आहे.शिक्षकांअभावी विद्यार्थी संख्या कमी होत असतानाही शिक्षण विभागाकडून रिक्त पदावर शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.या प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाºयांनी लक्ष देऊन शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, अशी मागणी आसेगाव व परिसरातील पालकातून होत आहे.
परभणी : तीन विषयांना मिळेनात वर्षभरापासून शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:38 AM