विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेले आहे.जिंतूर तालुक्यात २००४-०५ या वर्षी येलदरी जलशायातून २३ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेवर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आला.योजनेतील अक्षम्य चुका, नियोजनाचा अभाव व योजना हस्तांतरित न झाल्याने या योजनेचे पाणी गावात पोहचलेच नाही. या योजनेच्या मोटार बंद अवस्थेत असल्याने त्यांच्यावर गंज चढला आहे. येलदरी परिसरात हे साहित्य पडून आहे. कुºहाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वापर ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत.बारा गाव योजनचेही हेच हाल आहेत. सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटवर ही योजना चालते. योजनेचे पाणी सुरुवातीच्या दोन वर्षात पाच ते सहा गावांपर्यंत पोहचले; परंतु, लगेच या योजनेत तांत्रिक बिघाड होऊन ही योजना बंद झाली. या योजनेचे भले मोेठे जलशुद्धीकरण केंद्र जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे आहे. जे बेवारस अवस्थेत पडून आहे. निवळी धरणातून १६ गाव कुपटा योजनेलाही अखेर घरघर लागली आहे. या योजनेवर बोरी, कौसडी व अनेक मोठी गावे आहेत. या योजनेवर १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. योजनेचे पाणी काही काळ चार ते पाच गावांना मिळत होते. मात्र मागील दोन वर्षांपासून हे वीज बिल न भरल्यामुळे योजनाच बंद पडली आहे.जलशुद्धीकरण केंद्र बनले शौचालय२३ गाव पिंपळगाव काजळे पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र कुºहाडी येथे आहे. या केंद्राचा वापर गावातील ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत. तसेच अवैध धंदे, जुगार व दारू पिणाऱ्यांचा अड्डा हे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे चोहू बाजूने साचलेली घाण व गवत यामुळे हे केंद्र रोगराईचे केंद्र बनले आहे. या केंद्रातील लाखो रुपयांचे साहित्य, मशिनरी धूळ खात पडून आहे.
परभणी : कोट्यावधींच्या मालमत्तेची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:33 AM