परभणी : जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी सक्रीय झाली आहे. आज तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत घसरल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
मागील काही वर्षांची तुलना करता, यावर्षी जिल्ह्यात थंडी बरेच दिवस रमणार असल्याचे दिसत आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात थंडीची लाट आली होती. त्यानंतर तापमानात काहीशी वाढ झाली. परंतु चार दिवसांपासून मात्र पुन्हा थंडीची लाट जिल्ह्यात पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि थंड वारे वहात असल्याने परभणीकरांना थंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तापमानात घट सुरू झाली.
मंगळवारी तापमान ७.५ अंशापर्यंत घसरले होते. मात्र,आज पारा ४ अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांना पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवारी पहाटेपासूनच थंडी वाढण्यास सुरुवात झाली. सकाळी उशिरापर्यंत थंडीचा जोर कायम होता. एकीकडे ऊन तापत असताना दुसरीकडे थंडीही तेवढीच जाणवत असल्याने नागरिक थंडीने बेजार झाले आहेत. सायंकाळी शहरातील रस्ते सुनसान होत आहेत. बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे.