लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील वांगीरोड भागात नामवंत कंपनीचे लेबल वापरुन त्यात निकृष्ट दर्जाची तंबाखू भरणाऱ्या कारखान्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. १ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ही कारवाई केली असून त्यात सुमारे २ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, वांगीरोड भागात शेख इलियास शेख गफार हा व्यक्ती त्याच्या घरी फास्टट्रॅक पॅकर्स प्रा.लि.संगमनेर ट्रेडमार्क ओनर मे.दामोधर जगन्नाथ मालपाणी यांच्यातर्फे उत्पादित केला जाणारा वेगवेगळ्या पॅकिंगमधील गायछाप आणि व्ही.एच.पटेल यांच्या सूर्यछाप तंबाखूचे उत्पादन स्वत:च्या राहत्या घरी बनावटपद्धतीने तयार करीत होता. यासाठी बनावट लेबल, रॅपर स्वत: छापून त्यात पॅकिंग करुन त्यात निकृष्ट दर्जाची तंबाखू भरली जात होती. ही तंबाखू गायछाप व सूर्यछाप असल्याचे सांगून मूळ कंपनीची फसवणूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे १ फेब्रुवारी रोजी रात्री छापा टाकण्यात आला.छापा टाकला तेव्हा गायछाप आणि सूर्यछाप या उत्पादनांचे हुबेहुब लेबल, रॅपर व पॅकिंग करुन पोत्यामध्ये भरलेला साठा, बॉक्स पॅकिंगमध्ये खुली तंबाखू आढळली. स्वत:च तयार केलेले हे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी साठविले होते. हा १ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी अनिल हिंगोले यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, अनिल हिंगोले, आशा शेल्लाळे, अरुण पांचाळ, शेख ताजोद्दीन शेख हसन व फास्टट्रॅक प्रा.लि. संगमनेर या कंपनीने प्राधिकृत केलेले संजय सिद्रामाप्पा टेकाळे यांनी ही कारवाई केली.आणखी आरोपी असण्याचा संशयवांगीरोड भागात बनावट तंबाखूचा कारखाना असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईनंतर उघड झाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतरही अनेकजण सहभागी असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करणार असून जिल्ह्यात हा साठा कुठे विक्री झाला, याचीही माहिती काढली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी सांगितले.आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी४बनावट तंबाखूचा साठा जप्त केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी शेख इलियास शेख गफूर याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.४शनिवारी या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा तपास नानलपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुजारी हे करीत आहेत.
परभणी : बनावट तंबाखूच्या कारखान्याचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:22 AM