लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी ) : घरात बॉम्ब बाळगणाºयांना आता देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही संबोधले जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने शनिवारी येथे आयोजित सभेत बोलताना केला.पाथरी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व ‘संविधान बचाव, देश बचाव’ अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत कन्हैय्याकुमार बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.बाबाजानी दुर्राणी यांची तर व्यासपीठावर आ.मधुसूदन केंद्रे, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, परभणीच्या महापौर मीनाताई वरपूडकर, नगराध्यक्षा मीना भोरे, भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर, ह.भ.प. सारंगधर महाराज, दादासाहेब टेंगसे, मुंजाजी भाले, राजीव पामे, अनिल नखाते, सुभाष कोल्हे, माधवराव जोगदंड, तुकाराम जोगदंड, दशरथ सूर्यवंशी, तबरेज खान दुर्राणी, जुनैद खान दुर्राणी, एकनाथ शिंदे, अशोक गिराम, कॉ.राजन क्षीरसागर, लिंबाजी कचरे, राजेश ढगे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, देशात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला; परंतु, कर्मचाºयांच्या वेतनामध्ये वाढ होण्याऐवजी कमी वेतन झाले आहे, ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना आहे. नोटाबंदीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५० दिवसांचा कालावधी मागितला होता. नोटाबंदीने नक्षलवादी चळवळी थांबल्या जातील, अतिरेक्यांचे कंबरडे मोडेल, असा दावा केला गेला होता. आता नोटाबंदीला अनेक महिने उलटले आहेत तरीही रोजच देशाच्या सिमेवर जवान अतिरेक्यांसोबत लढताना शहीद होत आहेत. याचे उत्तर आता पंतप्रधानांकडे नाही. देशात आज घरामध्ये बॉम्ब बाळगणाºयांना देशभक्त ठरविले जात आहे. तर हक्कासाठी लढणाºयांना देशद्रोही ठरविले जात असल्याचा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार याने केला. यावेळी बोलताना आ.दुर्राणी म्हणाले की, भारतीय संविधान सुरक्षित राहिले तर देश सुरक्षित राहील. संविधानामुळेच सर्वांना समान प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी बोलताना वरपूडकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाचे धोरण सर्व सामान्यांच्या हिताविरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपाला विरोध केला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजाहेद खान यांनी तर सूत्रसंचालन अॅड. अमोल गिराम यांनी केले. कार्यक्रमास मानवत, पाथरी, सोनपेठ तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
परभणी : बॉम्ब बाळगणाऱ्यांना देशभक्त ठरविले जातेय - कन्हैय्याकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:45 AM