लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): तालुक्यातील आहेरवाडी येथे श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचा समारोप २९ मार्च रोजी झाला. यानिमित्त गुरुवारी भाजीभाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतला.पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये श्री सजगीर महाराज हिरागिरी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या यात्रेस जिल्हा व जिल्हाबाहेरील हजारो भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त समारोपप्रसंगी भाजीभाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. भाजीभाकरीचा महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक सकाळपासूनच आहेरवाडी येथे दाखल होतात. वांग्याची भाजी व भाकरीच्या महाप्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.महाप्रसादासाठी ६० क्विंटल वांगे वापरण्यात आले. तसेच गव्हाच्या पोळ्या व ज्वारीच्या भाकरी तयार करण्यासाठी ५० क्विंटल पीठ वापरण्यात आले. भाविकांची पंगत बसविण्यासाठी १० एकर जागेचा वापर करण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाकरी बनविण्यासाठी १५० कुटुंबांनी सहकार्य केले. हजारो भाविकांसह खा.संजय जाधव,आ. डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.डॉ.राहुल पाटील, औरंगाबाद येथील योगेश रामचंद्र देवरे पाटील आदी उपस्थित होते. देवरे यांनी संस्थानसाठी ११ लाख रुपयांची देणगीही दिली.यात्रेस : प्रतिसादआहेरवाडी येथे २२ मार्चपासून यात्रेस सुरुवात झाली. ही यात्रा आठवडाभर चालली. यानिमित्त विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी गर्दी झाली होती. या स्पर्धेत ५०० मल्लांनी सहभाग नोंदविला. तसेच आठ दिवस चाललेल्या यात्रेमध्ये जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होेते.
परभणी: पंचेवीस हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:14 AM