लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): सध्या शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना शहरातील सिध्दार्थनगर, डॉ. आंबेडकर नगर भागाला पाणीपुरवठा होणाऱ्या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे; परंतु, याकडे पालिकेचा पाणीपुरवठा विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.पूर्णा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून पालिका परिसरात २ तर सिद्धार्थ नगर परिसरात १ असे एकूण ३ जलकुंभ उभारण्यात आले आहेत. पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी या जलकुंभात साठवले जाते. मागील दीड महिन्यांपूर्वी शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने सिद्धेशवर जलाशयातून ०.५ दलघमी पाणी पूर्णा शहराला पिण्यासाठी सोडण्यात आले होते. सद्य स्थितीत शहरात पालिकेकडून आठवड्यातूून एकवेळा पाणीपुरवठा केला जातो. तर दुसरीकडे कोल्हापुरी बंधाºयातील पाणीसाठा हळूहळू कमी होत चालला आहे.शहरावर पाणीटंचाईचे सावट असताना सिद्धार्थनगर भागातील या जलकुंभातून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभाची पाणी साठवण क्षमता २ लाख लिटर आहे. जलकुंभातून गळती झालेले पाणी परिसरातील खोलगट भागात साचल्याने त्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. साचलेल्या पाण्यात दररोज महिला धुणे धुताना तर बालगोपाल पोहण्याचा आनंद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
परभणी: पालिकेच्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:31 AM