लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): ऊसतोडीच्या कामासाठी उचल म्हणून घेतलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने आॅटोत टाकून पळवून नेत हवाला मिळाल्यानंतर सोडून दिल्याची घटना गंगाखेड येथे २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.गंगाखेड तालुक्यातील पिंपरी येथील सुभाष सोपान कांबळे यांनी ६ महिन्यांपूर्वी इसाद येथील सगुणाबाई इसादकर यांच्याकडून ऊसतोडीच्या कामासाठी ६५ हजार रुपयांची उचल घेतली होती. कामाला जायचे नाही म्हणून महानंदा सुभाष कांबळे यांनी यातील २० हजार रुपये सगुणाबाई इसादकर यांना परत दिले. सुभाष कांबळे यांचे कुुटुंंब दुसरीकडे कामाला निघून गेले. उचल घेतलेले हे पैसे परत मागण्यासाठी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सगुणाबाई इसादकर यांनी सुभाष कांबळे यांचे भाऊ मुंजाजी कांबळे यांच्याघरासमोर बसत माझ्याकडून ऊसतोड कामाच्या उचलीचे पैसे परत मागितले. दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आलेल्या मुंजाजी सोपान कांबळे यांनी मी किंवा माझ्या आईने तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत. तरीही येणाऱ्या १० तारखेपर्यंत माझ्या भावांनी घेतलेले तुमचे पैसे परत देऊ असे सांगितले; परंतु, इसादकर यांनी पिंपरी येथील अजय भिसे यांना बोलावून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंजाजी कांबळे यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यासह आईला आॅटोत बसवून गंगाखेड येथील दत्तमंदिर परिसरात आणले.आॅटोमध्ये मारहाण करीत पैसे दिले नाहीत तर जिवंत ठेवणार नाहीत, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रकाश प्रभू भिसे यांनी पैशाचा हवाला घेत फिर्यादी मुंजाजी कांबळे व त्याच्या आईला सोडविले असल्याची फिर्याद शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंजाजी कांबळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास सगुणाबाई इसादकर (रा.इसाद), अजय भिसे (रा.पिंपरी) यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.
परभणी : ऊसतोडीच्या पैशावरून तीन जणांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:42 PM