लोकमत न्यूज नेटवर्कवस्सा (परभणी): जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील किराणा दुकान, घर व ३ पानटपऱ्या फोडून अज्ञात चोरट्यांनी २५ जून रोजी हैदोस घातल्याची घटना घडली आहे.वस्सा येथे २५ जून रोजीच्या पहाटे वीज गेल्याने अंधाराचा फायदा घेत गावातील शिक्षक कॉलनीतील रामेश्वर दादाराव नालमवार यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. मात्र त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा टी पॉईंटवरील पानटपरीकडे वळविला. विष्णू राऊत यांची पानटपरी फोडून २ हजार ५०० रुपये, शाहरूख खान यांच्या पानटपरीतून ७०० रुपये व महादा शिंदे यांच्या पानटपरीतून २०० रुपये लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा महात्मा फुले विद्यालयासमोरील सिद्धेश्वर सोमेश्वर स्वामी यांच्या किराणा दुुकानाकडे वळविला. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडुून चोरट्यांनी दुकानातील रोख २५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार सिद्धेश्वर स्वामी यांनी बोरी पोलीस ठाण्यात दिली.या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे बोरी पोलिसांंनी लक्ष देऊन वस्सा व परिसरात रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
परभणी : वस्सा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:39 AM