लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गेल्या ५ वर्षात केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून या सरकारला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथील जाहीर सभेत बोलताना केला.परभणी लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजीमंत्री राजेश टोपे, उमेदवार राजेश विटेकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रसिका ढगे, फौजिया खान, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, माजी आ.सुरेश देशमुख, माजी खा.तुकाराम रेंगे, शहर अध्यक्ष स्वराजसिंह परिहार, प्रताप देशमुख, रविराज देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आ. रामराव वडकुते, सोनाली देशमुख, नदीम इनामदार, नंदा राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी सरकारने शेतकरी, बेरोजगार, दलित, आदिवासी यांची खोटी आश्वासने देऊन फसवणूक केली. त्यामुळे या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे.गेल्या ६० वर्षात जेवढ्या घोषणा करण्यात आल्या नव्हत्या, तेवढ्या घोषणा या सरकारने ५ वर्षात केल्या आहेत. किती खोटं बोलायचं याला मर्यादा असते; परंतु, या सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. नोटाबंदीने देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. राफेल विमान खरेदीत देशाची फसवणूक केली. याबाबतच्या कागदपत्रांची चोरी झाली, असे सरकार म्हणत असेल तर चोरी प्रकरणाची पोलिसांत फिर्याद का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. मराठा, मुस्लिम, धनगर समाजाचीही या सरकारने फसवणूक केली. त्यामुळे या सरकारला घालवण्यासाठी परभणीकरांनी राजेश विटेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उमेदवार विटेकर, आ.दुर्राणी, वरपूडकर, फौजिया खान आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेनेचे प्रा.शिवाजी दळणर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमाकांत कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संतोष बोबडे यांनी केले.
परभणी : मोदी सरकारला धडा शिकविण्याची हीच वेळ -पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:19 AM