लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. त्यातच परभणी, पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नुकतेच जून महिन्यात पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणीपुरवठा करताना नगरपालिकेची दमछाक होत आहे. सध्या शहरवासियांना ५ दिवसानंतर पाणी सोडण्याची वेळ नगरपालिकेवर आली आहे.सेलू शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. दुधना प्रकल्पाच्या परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचा पंपहाऊस आहे. प्रकल्प बॅकवाटरमध्ये जवळपास १५ इंटेक वेल घेण्यात आल्या आहेत. त्याद्वारे शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. दुष्काळी परिस्थिती असल्याने यंदा पाणी पातळी खालावली. त्यामुळे बहुतांशी हातपंप व विधंन विहिरी कोरड्या पडल्या आहेत.परिणामी, शहरातील नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. कडक उन्हाळ्यात व टंचाई काळात नगरपालिकेने नियोजन करून शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा केला. त्यामुळे सेलू शहरात पाणीटंचाई जाणवली नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी आणि पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे पालिकेच्या सर्वच इंटेक वेल कोरड्या पडल्या आहेत. बॅकवॉटरचे १ कि.मी. अंतरावरचे पाणी गायब झाले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना पालिकेला चांगलीच कसरत करावी लागत आहे.इंटेक वेल कोरड्या पडल्या असल्याने नगरपालिकेने चर खोदून इंटेक वेलपर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच खड्डा खोदून त्यात विघुत मोटारी टाकल्या आहेत. १०० मीटर अंतरावरून पाणी पंपहाऊसमध्ये आणले जात आहे; परंतु, हे काम करण्यासाठी वेळ लागत असल्याने शहरातील जलकुंभ भरण्यास अतिरिक्त कालावधी लागत आहे़ परिणामी पाणी सोडण्याच्या वेळेत पालिकेला बदल करावा लागत आहे. तसेच शहरातील काही भागात ५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. निम्न दुधनातील पाणीसाठा घटल्याने दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाच दिवसाआड करावा लागला. परिणामी निम्न दुधना प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने पाणीपुरवठा करताना पालिकेला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
परभणी : पाणीपुरवठा करताना पालिकेची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:33 AM