लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दम्याच्या रुग्णांसाठी मोफत औषध देण्याची शहाणे परिवाराची परंपरा तीन पिढ्यांपासून सुरू असून, यावर्षीही ८ जून रोजी हे औषध घेण्यासाठी परभणीत सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती़येथील गांधी पार्क भागातील शहाणे परिवाराच्या वतीने मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर दम्याचे मोफत औषध दिले जाते़ या परिवारातील किसनराव शहाणे यांनी १९३८ पासून हे औषध देण्यास सुरुवात केली आहे़ त्यांचे सुपुत्र माधवराव शहाणे, तिसऱ्या पिढीतील लक्ष्मणराव शहाणे यांनी ही परंपरा राबविली आणि आता शहाणे परिवारातील सदस्य अखंडितपणे मोफत औषध देण्याचा वारसा चालवित आहेत़ ८ जून रोजी मृग नक्षत्र असल्याने जिल्ह्यासह परजिल्ह्यातून अनेक ग्रामस्थ सकाळपासूनच शहरात दाखल झाले होते़ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहाणे परिवाराने तयार केलेले हे औषध प्रत्येकाला वितरित करण्यात आले़ ६़१२ मिनिटांनी मृग नक्षत्र असल्याने औषध घेण्याची सूचना करताच एका ओळीने औषध सेवन करण्यात आले़ दरवर्षी हे औषध घेण्यासाठी या भागात रांग लागते़ शनिवारी सकाळपासूनच ही रांग लागली होती़ सायंकाळी ५ वाजेपासून औषध वाटपास सुरुवात झाली़ हे औषध घेण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती़ औषध वाटप करण्यासाठी गांधी पार्क मित्र मंडळाच्या ५० सदस्यांनी प्रयत्न केले़ विशेष म्हणजे, औषध घेण्यासाठी दूरवरून आलेल्या रुग्णांची निवास व भोजनाची व्यवस्थाही गांधी पार्क मित्र मंडळाच्या वतीने मोफत केली होती़ मागील तीन पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही अखंडितपणे राबविण्यात आली़ दम्याच्या रुग्णांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर हे औषध घेतल्यानंतर पावसाळ्यात होणारा दम्याचा त्रास कमी होत असल्याचे शहाणे परिवाराचे म्हणणे आहे़ त्यास अनेकांना गुण येत असल्याने औषध घेण्यासाठी गर्दी होते़६० किलो औषधाची निर्मितीशहाणे परिवाराच्या वतीने दरवर्षी विशिष्ट पद्धतीने गोळी तयार केली जाते़ त्यात गूळ, हिंग आणि आयुर्वेदिक औषधीचा वापर करण्यात येतो़ यावर्षी ६० किलो औषध तयार करण्यात आले होते़ त्यासाठी ४ तासांचा वेळ लागला़ शहाणे परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून हे औषध बनविले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गांधी पार्क येथे उपस्थित असलेल्या हजारो रुग्णांना या औषधीचे वाटप करण्यात आले.
परभणी : मृगाच्या मुहुर्तावर मोफत औषध वाटपाची तीन पिढ्यांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 10:37 PM