लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील मुख्य रस्त्यावरील संत सावता माळी चौकात नगरपालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या कमानीचे काम मागील दीड महिन्यापासून रखडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. यामुळे या रस्त्यावर असलेल्या व्यापाऱ्यांना, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.पालिकेकडून विशेष निधी खर्च करुन संत सावता माळी चौकाचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी दोन खांबाची २५ फूट कमान उभारण्यात येत आहे. या कमानीमुळे संत सावता मार्गाचे सौंदर्य वाढणार आहे. मात्र मागील दीड महिन्यापासून या कमानीचे काम बंद पडले आहे. कमानीचे दोन्ही खांब पूर्ण झाले असून वरच्या बाजूचे काम करण्यासाठी गुत्तेदाराने दीड महिन्यापासून सेंट्रींग ठोकली आहे. यामुळे या रस्त्याची वाहतूक बंद पडली आहे. मुख्य रस्त्याला जोडणाºया संत सावता माळी रस्त्यावर नवीन व्यावसाय स्थिरावले आहेत. यामध्ये किराणा, कापड, दवाखाना, बँक यासह छोटे-मोठे व्यवसायिक आहेत. सेंट्रींग ठोकल्याने हा रस्ता बंद झाला आहे. यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने तत्काळ कमानीचे काम सुरु करावे, अशी मागणी व्यापाºयातून होत आहे. दरम्यान, कोक्कर कॉलनीमध्ये होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम ही रखडले आहे, हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
परभणी : कमानीचे बांधकाम रखडल्याने वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:33 AM