लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील गौंडगाव बसस्थानक परिसरात रविवारी पहाटे ८ वाजेच्या सुमारास महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला.गोदावरीनदी पात्रातील वाळू धक्क्याचा लिलाव झालेला नसतानाही तालुक्यातील गौंडगाव येथील गोदावरी नदीपात्रातून असंख्य ट्रॅक्टर राजरोसपणे विनापरवाना अवैध वाळू उपसा करीत आहेत. उपसा केलेली वाळू गायरान जमिनीवर साठा करुन रात्री व पहाटेच्या सुमारास ही वाळू वाहनात भरुन साळापुरीमार्गे परभणी व इतर ठिकाणी हलवित असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्यासह मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, तलाठी चंद्रकांत साळवे, विनोद मुळे यांच्या पथकाने वेगवेगळ्या मार्गाने गौंडगावकडे धाव घेतली.तहसीलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी एका मार्गाने, तलाठी चंद्रकांत साळवे व विनोद मुळे यांनी दुसऱ्या मार्गाने गौंडगाव गाठले. त्या क्षणी गौंडगाव येथून अवैध वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर गौंडगाव बसस्थानकाजवळ पकडून ताब्यात घेतला. यावेळी ट्रॅक्टर सोबत असलेले इतर ट्रॅक्टर चालक पसार झाले. महसूल प्रशासनाने रविवारी केलेल्या या कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून वाळूचोरीला आळा बसेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
परभणी : अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:41 AM