लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षी पावसाअभावी रब्बी हंगामावर पाणी फेरल्याने येथील मोंढा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून या बाजारपेठेतील तब्बल २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.परभणी जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून या जिल्ह्याचा आर्थिक डोलारा शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. खरीप, रब्बी हंगाम चांगले झाल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठेतही उलाढाल वाढते. मोंढा बाजारपेठे बरोबरच सर्वसाधारण बाजारपेठेतही खरेदी- विक्री व्यवहार वाढत असल्याचा आजवरचा अनुभव आहे. यावर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामामध्ये कसे-बसे शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतले असले तरी परतीचा पाऊस झाला नसल्याने रब्बी हंगामावर पाणी सोडावे लागले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधी आदींची खरेदी- विक्री होत असते.परभणी शहरातील मोंढा बाजारपेठेत दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून खरेदी- विक्रीला सुरुवात होते. मात्र यावर्षी पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. परिणामी मोंढ्यातील बाजारपेठ ठप्प आहे. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बियाणे आणि खतांची खरेदी- विक्री होते. यातून बाजारपेठेमध्ये उलाढाल वाढते. मात्र यावर्षी बाजारपेठेमध्ये आतापर्यंत केवळ १० ते २० टक्के उलाढाल झाल्याची माहिती मिळाली.परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये खतांची विक्री करणारे ५० आणि बियाणे व औषधींची विक्री करणारे सुमारे १२५ विक्रेते आहेत. या विक्रेत्यांच्या माध्यमातून शेतकºयांपर्यंत कृषी निविष्ठा पुरविल्या जातात.जिल्ह्यात १३ टक्के रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरेदी-विक्रीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले. परभणी शहरातील संपूर्ण बाजारपेठेचा आढावा घेतला तर २५ ते ३० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याची माहिती येथील व्यापाºयांनी दिली.खताला ३० टक्क्यांचा फटका४परतीचा पाऊस झाला नसल्याने खताच्या विक्रीलाही चांगलाच फटका बसला आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये ३० हजार टन खताची विक्री या बाजारपेठेमध्ये झाली होती. त्यातून तब्बल ४२ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यावर्षी रब्बीची पेरणी झाली नसली तरी ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकºयांनी पिके घेतली आहेत. तसेच भाजीपाल्याची लागवडही अनेक भागात होत आहे. असे असले तरी खताची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घटली आहे.बियाणे विक्री घटली४रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, करडई, भूईमुग आदी पिके घेतली जातात. या पिकांच्या बियाणांची खरेदी मोंढा बाजारपेठेतून केली जाते. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार मागील वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये सुमारे ४२५ टन बियाणांची विक्री झाली होती. यावर्षी मात्र ही विक्री १७ ते २० टनापर्यंत झाली आहे. गहू आणि ज्वारी ही या हंगामातील महत्वाची पिके आहेत; परंतु, या पिकांचे बियाणेही विक्री झाले नाहीत. याच काळात भूईमुग बियाणाची विक्री होते. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात सर्वसाधारणपणे १७० टन भूईमुग बियाणे विक्री झाले होते. यावर्षी ही विक्री मोठ्या प्रमाणावर घटली आहे. अशीच परिस्थिती कीटकनाशकांच्या बाबतीतही आहे. रब्बी हंगामात पेरणी झाल्यानंतर पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशकांची फवारणी केली जाते. गतवर्षीच्या हंगामात परभणी बाजारपेठेतून १० ते १५ कोटी रुपयांचे कीटकनाशके विक्री झाली होती. यावर्षी ही विक्री ४ ते ५ कोटी रुपयांवर येऊन ठेपली आहे.यावर्षीच्या रब्बी हंगामात पेरणी झाली नसल्याने बाजारपेठेमध्ये दोन महिन्यांपासून शुकशुकाट आहे. ग्राहक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करुनही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी व्यवसायात मोठी घट झाली आहे.- रमेशराव देशमुख, विक्रेते
परभणी : २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्पं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:44 PM