लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बनावट सोने देऊन ५० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात ३१ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी घटनेतील आरोपींना सापळा रचून अटक केली.औरंगाबाद येथील आॅटोचालक सुभाष चिमाजी इंगोले यांना शेख जावेद (रा.डफवाडी) हा औरंगाबाद येथे भेटला. त्यावेळी माझ्या शेजारी असलेल्या शेतात सोन्याचा हंडा सापडल्याचे सांगून पाव किलो सोने ३ लाख रुपयांना देतो, असे तो म्हणाला. त्यानंतर सुभाष इंगोले यांनी २० मार्च रोजी परभणी येथे येऊन सोन्याची खात्री केली. त्यानंतर हे सोने घेतले तर फायदा होईल, असा विचार करुन इंगोले यांनी घरातील तीन तोळे सोने गहाण ठेवून ५० हजार रुपये घेतले व हे पैसे शेख जावेद व त्याच्या सोबतच्या एका महिलेला देऊन एक छटाक सोने म्हणून त्यांच्याकडून दागिणा घेतला. मात्र हे सोने नसून पितळाचे दागिणे असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर इंगोले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ३१ मार्च रोजी तक्रार नोंदविली. त्यावरुन शेख जावेद व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केला. दुसºयाच दिवशी परभणी तालुक्यातील उमरी येथे एका महिलेच्या घरी सापळा रचण्यात आला. त्यावेळी शेख जावेदही पोलिसांना त्याच ठिकाणी मिळून आला. घराची झडती घेतली असता सोन्याची बनावट नाणे व ४९ हजार रुपये मिळून आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपी शेख जावेद शेख इनायत आणि आशाबाई अक्काबाई सदाशीव पवार या दोघांनाही कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, किशोर नाईक, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, सय्यद मोईन, दिलावर पठाण, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, ज्योती चौरे, अरुण पांचाळ, राजेश आगासे, परमेश्वर श्ािंंदे, संजय शिंदे आदींनी केली.
परभणी : बनावट सोने देणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:02 AM