लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : हयातनगर येथून सराफा दुकान बंद करून सुहागनकडे येत असताना एका कारने पाठीमागून धडक दिली व डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन सराफा व्यापाºयास लुटल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रविवारी रात्री ११ च्या सुमारास पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला़पूर्णा तालुक्यातील सुहागन येथील गोविंद विश्वनाथ भोसले यांचे वसमत तालुक्यातील हयातनगर येथे सराफाचे दुकान आहे़ ८ सप्टेंबर रोजी गोविंद भोसले व त्यांचा भाऊ हनुमान भोसले हे दोघे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून दुचाकीने सुहागन गावाकडे येत होते. तेवढ्यात हयातनगर ते सुहागण रस्त्यावर त्यांचा पाठलाग करीत असलेल्या एम.एच.२१ सी. २५९१ या क्रमांकाच्या मारोती कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली़ त्यामुळे हे दोघे भाऊ दुचाकीवरून खाली पडले़ त्यावेळी कारमधील एकाने गोविंद भोसले यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्याकडे असलेले सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल असा २ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेत दोन्ही भावांना किरकोळ दुखापत झाली. त्यांनी तातडीने सुहागन ग्रामस्थांना ही माहिती सांगितली, त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने पूर्णा पोलीस ठाण्याला फोन केला़ पोलिसांनी चुडावा, हट्टा आणि वसमत पोलिसांना नाकाबंदीचा निरोप दिला़ त्याचवेळी आरोपी हयातनगरच्या दिशेने कारद्वारे पळून गेल्याचे गोविंद भोसले यांच्या लक्षात आले़ त्यांनी तातडीने हयातनगर येथील ओळखीच्या ग्रामस्थांना या संदर्भात मोबाईलवर संदेश दिला़ त्यानंतर हयातनगर येथील ग्रामस्थ सुहागन रस्त्यावर येऊन थांबले़ यावेळी त्यांना समोरून भोसले यांनी सांगितलेली कार येताना दिसली़ त्याक्षणी कारमधील आरोपींना समोर ग्रामस्थ दिसल्याने त्यांना पकडले जाण्याची शंका आली़ त्यामुळे कारमधील चौघांनी कार उभी करून शेतीत पळ काढला़ तोपर्यंत कारचा चालक वाहनातच बसून होता़ ग्रामस्थांनी धावत येऊन कार चालकाला ताब्यात घेतले़ त्यानंतर पूर्णा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली़ पूर्णा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार आणि एका आरोपीस ताब्यात घेतले़ या प्रकरणी हनुमंत भोसले यांच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री ११ च्या सुमारास पूर्णा पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परभणी : दोन सराफा व्यापाऱ्यांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:55 AM