लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एस.टी.महामंडळाने हस्तलिखित पासेस बंद करुन ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. मात्र हे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी परभणी शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकामधील कार्यालयासमोर तीन-तीन दिवस रांगेमध्ये उभे रहावे लागत असल्याने ज्येष्ठांची हेळसांड होत आहे.राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन उपक्रम राबवित आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यातच एस.टी.महामंडळाच्या वतीने मागील काही दिवसांपासून हस्तलिखित पासेस बंद करुन नवीन स्मार्ट कार्ड देण्याचे ठरविण्यात आले. हे स्मार्टकार्ड दोन प्रकारचे असून यामध्ये वैयक्तिक व अवैयक्तिक या दोन प्रकारांचा समावेश आहे. वैयक्तिक कार्डधारण करणाऱ्या प्रवाशांमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणाºया प्रवाशांचा समावेश होतो.परभणी बसस्थानकात तालुक्यातील व शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी बसस्थानकातील पासेस देण्याच्या विभागात एक संगणक संच व एका कर्मचाºयाची नियुक्तीही केली आहे; परंतु, याच कर्मचाºयाकडे ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पासेसही देण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत विद्यार्थ्यांना पासेस देण्यात येत आहेत. त्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वाटप करण्याचे काम सुरु आहे; परंतु, त्यातच तांत्रिक अडचणी, ज्येष्ठांची वाढलेली गर्दी यामुळे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तीन- तीन दिवस वाट पहावी लागत आहे. विशेष म्हणजे हे स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी ग्रामीण भागातून व शहरातून सकाळी ८ वाजेपासून नागरिक बसस्थानकात दाखल होऊन कार्ड मिळविण्याच्या रांगेत उभे राहत आहेत; परंतु, वेळेत कार्ड मिळत नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.याकडे एस.टी.महामंडळाच्या बसस्थानक प्रमुखांसह आगारप्रमुखांनी लक्ष देऊन स्मार्ट कार्ड वाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.एस.टी. महामंडळ : प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार४एस.टी.महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना आजपर्यंत आधारकार्ड व निवडणूक विभागाचे ओळखपत्र वयाचा दाखला म्हणून स्वीकारत अर्ध्या तिकीट सवलतीचा लाभ दिला; परंतु, मागील काही वर्षांपासून या ओळखपत्रामध्ये जास्तीचे वय दाखवून एस.टी. महामंडळांचा लाभ घेण्याचे प्रमाण प्रशासनाच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून एस.टी.महामंडळ प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांना आता स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे.४ हा निर्णय झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी परभणीच्या बसस्थानकामधील पासेस विभागाकडे गर्दी होईल, याचे भान न राखता एस.टी. महामंडळाने केवळ एकाच कर्मचाºयावर विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्याचे काम दिले आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळ प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.मी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील रहिवासी असून एस.टी.ने ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतल्यामुळे पासेस विभागाकडे आलो आहे. सोमवार, मंगळवार दोन दिवस रांगेत उभे राहूनही अद्यापपर्यंत माझा नंबर लागला नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून मला स्मार्ट कार्ड न घेताच आल्या पावली परतावे लागत आहे.- अप्पाराव खाकरे, ज्येष्ठ नागरिकअर्ध्या तिकीटाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एस.टी.च्या आवाहनानुसार मी दोन दिवसांपासून स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी परभणीच्या बसस्थानकातील पासेस विभागासमोर सकाळी ८ वाजेपासून रांगेत उभा राहत आहे; परंतु, प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे मला दोन्ही दिवस परत जावे लागले.- यमुनाबाई शेटे, परभणीएकीकडे एस.टी. महामंडळ प्रशासन प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी वेगवेगळ्या योजना आखून अंमलात आणत आहे. तर दुसरीकडे परभणी येथील बसस्थानकातील पासेस विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे मला तीन दिवसांपासून स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले. विशेष म्हणजे अद्यापही स्मार्ट कार्ड मिळालेले नाही.-प्रताप ठाकूर, परभणीज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड वाटप करण्यासाठी एक संगणक संच व एका कर्मचाºयाची नेमणूक केली आहे. याच कर्मचाºयाकडे विद्यार्थी पासेसचेही काम दिले आहे. त्यामुळे ज्येष्ठांची गैरसोय होऊ नये, यासाठी दररोज दुपारी ३ ते ५.३० व रविवारी दिवसभर ज्येष्ठांना स्मार्टकार्ड वाटप करण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र ज्येष्ठांना आवाहन करुनही ते सकाळपासून रांगेत उभे राहत आहेत.- वर्षा येरेकर, स्थानकप्रमुख, परभणी
परभणी बसस्थानकातील प्रकार;स्मार्टकार्डसाठी ज्येष्ठांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:38 AM