लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नळ जोडण्या अधिकृत करून घेण्यासाठी मनपा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून, मुदतीनंतर अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे़शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे़ येलदरी येथून परभणी शहराला पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे़ युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून ही पाणीपुरवठा योजना मार्गी लागली आहे़ या योजनेंतर्गत शहरात जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले असून आता नवीन नळ जोडणी देण्याचेही मनपाने निश्चित केले आहे़ ४ फेब्रुवारीपासून नागरिकांना नवीन जलवाहिनीवर जोडणी दिली जाणार आहे़ यासाठी महापालिकेच्या दोन विशेष सभांमध्ये नळ जोडणीचा दरही निश्चित करण्यात आला आहे़ नागरिकांनी नळ जोडणीसाठी प्रभाग समिती कार्यालयात सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे़ दरम्यान, शहरामध्ये नवीन नळ जोडणी देत असतानाच अनाधिकृत नळ जोडण्याची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे़ अनाधिकृत नळ जोडण्या अधिकृत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नागरिकांना कालावधी निश्चित करून दिला आहे़ त्यानुसार ४ ते २८ फेब्रुवारी या काळात नळ जोडणी अधिकृत करून दिली जाणार आहे़ त्यानंतर अनाधिकृत नळ जोडणी आढळल्यास २५ हजारांचा दंड आकारण्यात येईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे़
परभणी : अनधिकृत नळ जोडणी; २५ हजारांचा दंड ठोठावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:53 AM