लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील लिलाव झालेल्या वाळू धक्यांचे क्षेत्रफळ सोडून भलत्याच ठिकाणावरून कॅमेºयाची नजर चुकवित बेसुमार वाळूचा उपसा केला जात आहे. या विनापरवाना अनाधिकृत होत असलेल्या वाळू उपशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावत असल्याचे पहावयास मिळत आहे.गंगाखेड तालुक्यातून वाहणाºया गोदावरी नदीपात्रात असलेल्या अधिकृत १३ वाळू धक्यांपैकी केवळ चिंचटाकळी व दुस्सलगाव या दोनच वाळू धक्यांचा लिलाव झाला आहे. उर्वरित धक्यांचा लिलावच झाला नसल्याने गोदावरी नदीपात्रातील वाळूची चोरी करण्यासाठी वाळूमाफियांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगल्याचे चित्र गोदावरी नदीपात्रात ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. यातही सर्वाधिक वाळूचा उपसा कोण करतोय, यासाठी होत असलेली स्पर्धा पाहून गोदाकाठच्या गावातील पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरी थांबवावी, अशी मागणी होत आहे.महसूल प्रशासनाने चालू वर्षी घेतलेल्या वाळू धक्यांच्या लिलाव प्रक्रियेत तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, आनंदवाडी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, धारखेड, झोला, पिंपरी, नागठाणा, मसला या वाळू धक्यांपैकी चिंचटाकळी व दुस्सलगाव या दोन वाळू धक्यांचा अधिकृतपणे लिलाव झाला आहे. या वाळू धक्यांवरून होत असलेल्या वाळू उपशावर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने वाळू धक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. मात्र कॅमेºयांची नजर असलेल्या ठिकाणावरून मोजकीच मात्र इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याचे पहावयास मिळत आहे.गौंडगाव, मैराळसावंगी, खळी येथील वाळू धक्यांचा लिलाव झाला नसल्याचा फायदा घेत अधिकृत वाळू धक्यांवर असलेल्या कॅमेºयाची नजर चुकवून वाळू माफिया या धक्याच्या क्षेत्रातून रात्रं-दिवस ट्रॅक्टरच्या माध्यमातून राजरोसपणे बेसुमार वाळू उपसा करीत आहेत. दुस्सलगाव येथूूनही अवैध वाळू उपसा झाल्याचे पहावयास मिळत आहे. लिलाव न झालेल्या वाळूच्या धक्यातूून वाळूमाफियांनी गोदावरी नदीपात्रात धुमाकूळ घातल्याचे बोलल्या जात आहे. याकडे महसूल प्रशासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे....या ठिकाणी होतोय अवैध उपसागंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या मैराळ सावंगी, गौंडगाव, महातपुरी परिसर, आनंदवाडी, भांबरवाडी, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, झोला, पिंपरी, मसला आदी ठिकाणाहून शेकडो ट्रॅक्टरद्वारे रात्रं-दिवस वाळूचा उपसा केला जात असल्याचे समोर आले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने गोदावरी नदीतून उपसा केलेल्या वाळूचा गोदावरी नदीकाठी अनाधिकृतरित्या साठा करून ठेवण्यात येत आहे. या सर्व प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावागावात वाळू चोरीचे प्रकार दिवसेदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना वाळू माफियांनी मात्र याचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू केला आहे.
परभणी : कॅमेऱ्यांची नजर चुकवत वाळूचा बेसुमार उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:05 AM